नवी मुंबई : अनधिकृत बांधकामांविरोधात व टपरी माफियांविरोधात महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे. तुर्भे विभागात दोन दिवसामध्ये ९ अनधिकृत टपऱ्या हटविण्यात आले आहेत. इमारतीवरही हातोडा चालविण्यात आला असून होर्डींग्सही हटविण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील सर्व विभागात टपरी माफियांविरोधात मोहीम सुरू केली आहे. अनेक टपऱ्यांवर अपंगांचा स्टॉल्स, महानगरपालिकेच्यावतीने व्यवसाय सुरू असल्याचा उल्लेखही केला जात आहे. यापैकी विनापरवाना सुरू केलेल्या स्टॉल्सवर कारवाई केली जात आहे. तुर्भे विभागात ९ स्टाॅल्सवर कारवाई केली आहे. सेक्टर २० मध्ये परवानगी न घेता इमारतीचे बांधकाम केले जात होते. ते बांधकामही हटविले आहे. अतिक्रमण करणारांकडून १५ हजार रुपये दंडही वसूल केला आहे. परिसरातील अनधिकृत बॅनर, पोस्टर्स, अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातही मोहीम सुरू केली आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने उपायुक्त राहूल गेठे, सहाय्यक आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.