प्लास्टीकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात मोहीम; ६ जणांवर कारवाई
By नामदेव मोरे | Published: August 25, 2023 06:09 PM2023-08-25T18:09:19+5:302023-08-25T18:11:02+5:30
महानगरपालिकेने प्लास्टीकचा वापर करणारांविरोधात मोहीम सुरू केली आहे.
नवी मुंबई: महानगरपालिकेने प्लास्टीकचा वापर करणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. ऐरोली विभागात ६ व्यापाऱ्यांवर कारवाई करून ३० हजार रुपये दंड वसूल केला आहे. दुकानातील प्लास्टीकच्या पिशव्याही जप्त केल्या आहेत. महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्लास्टीक विरोधात नियमीत मोहीम राबविण्याच्या सूचना सर्व विभाग कार्यालयांना दिल्या आहेत. परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार यांच्या सूचनेप्रमाणे ऐरोली विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी महेंद्र सप्रे यांनी कारवाई सुरू केली आहे. ऐरोली कार्यक्षेत्रातील सेक्टर ३, सेक्टर १९ व सेक्टर २० येथील दुकानांना अचानक भेट देत तपासणी केली.
६ दुकानदारांमार्फत प्लास्टिक पिशव्यांचा व प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या वापर सुरु असल्याचे अढळले. सेक्टर ३ येथील टिपीकल मालवणी, शिव उपहारगृह, श्रीगणेश आहार केंद्र तसेच सेक्टर २० येथील शंकर फास्ट फूड, अंजली स्नॅक्स सेंटर आणि सेक्टर १९ येथील माजीसा डेकोरेटर्स या दुकानांवर कारवाई करत रुपये पाच हजार दंडात्मक रक्कम वसूल केली. कार्यवाहीमध्ये सहाय्यक आयुक्त महेंद्र सप्रे यांच्या नियंत्रणाखाली अधिक्षक,वसूली अधिकारी कृष्णा खैरनार, वरिष्ठ लिपिक गणेश जगले, लिपिक कल्पेश पाटील, स्वच्छता निरीक्षक नितीन महाले इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.