अनधिकृत होर्डिंग बॅनरविरोधात मोहीम सुरूच; ऐरोलीत २९८ ठिकाणी कारवाई
By नामदेव मोरे | Published: April 1, 2024 07:04 PM2024-04-01T19:04:02+5:302024-04-01T19:05:07+5:30
आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील सर्व होर्डिंग, पोस्टर्स हटविण्यात आले आहेत.
नवी मुंबई: ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून अनधिकृत होर्डिंग, बॅनर, कटआऊट, वॉलपोस्टर्सवर नियमित कारवाई सुरू केली आहे. पाच दिवसांमध्ये २९८ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक विभागाच्या ‘सी व्हिजील ॲप’वर आलेल्या तक्रारींचीही तत्काळ दखल घेतली जात आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील सर्व होर्डिंग, पोस्टर्स हटविण्यात आले आहेत. परंतु यानंतरही अनेक ठिकाणी भिंतीवर कोरलेला मजकूर, खासगी इमारतीवरील होर्डिंग, कटआऊट, बॅनर्स, झेंडा व भित्तीपत्रके पाहावयास मिळतात. ऐरोली विधानसभा क्षेत्रामधील दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे व तुर्भे विभाग कार्यालयाच्या माध्यमातून नियमित कारवाई केली जात आहे. यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. १७ ते २२ मार्च दरम्यान या परिसरामध्ये २९८ होर्डिंग बॅनर हटविण्यात आले आहेत.
निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असल्यास नागरिकांना तक्रारी करणे सहज शक्य व्हावे यासाठी निवडणूक विभागाने सी व्हिजील ॲप उपलब्ध करून दिला आहे. या ॲपवर नागरिकांना फोटोसह तक्रार करता येते. ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये या तक्रारींचीही तत्काळ दखल घेतली जात आहे. आतापर्यंत सी व्हिजील ॲपवर १५ तक्रारी आल्या असून त्या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
शहरातील अनधिकृत होर्डिंग व बॅनरविरोधात ऐरोली मतदारसंघात नियमित कारवाई केली जात आहे. याशिवाय निवडणूक विभागाच्या सी व्हिजील ॲपवर आलेल्या तक्रारींचीही तत्काळ दखल घेतली जात आहे. - डॉ. कैलास गायकवाड, नियंत्रक आचारसंहिता पथक, ऐरोली विधानसभा
सी व्हिजील ॲपचा नागरिकांना पर्याय
शहरात कुठेही होर्डिंग, बॅनर, कटआऊट, भित्तीपत्रके आढळल्यास नागरिक निवडणूक विभागाच्या सी व्हिजील ॲपवर फोटोसह तक्रारी करू शकता. या ॲपवर आलेल्या तक्रारीची पुढील १०० मिनिटांत दखल घेऊन उचित कार्यवाही केली जाते.
भरारी पथकाची नियुक्ती
ऐरोली मतदार संघासाठी १२ भरारी पथके तयार केली आहेत. एक पथकामध्ये ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २४ तास हे पथक कार्यरत असते.