कॅनडामधील महापौरांची पालिका मुख्यालयास भेट, विविध प्रकल्पांची केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 02:01 AM2019-11-24T02:01:21+5:302019-11-24T02:02:26+5:30
नवी मुंबई शहर आणि त्यातही विशेषत्वाने महापालिकेची मुख्यालय वास्तू अत्यंत सुंदर असून नवी मुंबई हे भारतातील अतिशय उत्तम शहर असल्याचा अभिप्राय कॅनडातील हॅमिल्टन शहराचे महापौर फ्रेड आयझेनबर्गर यांनी दिला.
नवी मुंबई - नवी मुंबई शहर आणि त्यातही विशेषत्वाने महापालिकेची मुख्यालय वास्तू अत्यंत सुंदर असून नवी मुंबई हे भारतातील अतिशय उत्तम शहर असल्याचा अभिप्राय कॅनडातील हॅमिल्टन शहराचे महापौर फ्रेड आयझेनबर्गर यांनी दिला.
नवी मुंबई महापालिका क्षेत्राची तसेच महापालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात येत असलेल्या उल्लेखनीय विविध कामांची, प्रकल्पांची माहिती चित्रमय सादरीकरणाव्दारे सादर करण्यात आली. यावेळी हॅमिल्टन शहराचे गुंतवणूक संचालक ग्लेन नॉर्टन यांनी देखील हॅमिल्टन शहराच्या उल्लेखनीय बाबींची सादरीकरणाव्दारे माहिती दिली. यावेळी चर्चात्मक संवादातून दोन्ही शहरातील उत्पन्न स्त्रोत, सेवा-सुविधा पूर्ततेच्या दृष्टीने कार्यपद्धती, प्राधान्यक्रम यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आतिथ्यशीलतेने भारावलेल्या हॅमिल्टन शहराच्या महापौरांनी त्यांच्या शहरात येण्याचे निमंत्रण नवी मुंबईचे महापौर, आयुक्त यांच्यासह पदाधिका-यांना दिले. यावेळी अतिथी महापौरांसह उपस्थित हॅमिल्टन महापौर कार्यालयाच्या संवाद सल्लागार मिशेल शान्ट्झ तसेच समन्वयक सिध्दार्थ लॉड यांचेही स्वागत करण्यात आले. या प्रसंगी महापौर जयवंत सुतार यांनी शहराच्या वतीने त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, स्थायी समितीचे सभापती नविन गवते, सभागृह नेता रविंद्र इथापे, विरोधी पक्षनेता विजय चौगुले आदी महापालिका पदाधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.