पनवेलमध्ये १३ हजार परवाने रद्द, परिवहन विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 03:53 AM2019-02-09T03:53:44+5:302019-02-09T03:54:24+5:30
वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहनचालकांविरोधात परिवहन विभागाने कडक धोरण राबविण्यास सुरु वात केली आहे.
पनवेल - वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहनचालकांविरोधात परिवहन विभागाने कडक धोरण राबविण्यास सुरु वात केली आहे. दोन महिन्यांत सुमारे १३ हजार चालकांचे परवाने रद्द केल्याची माहिती राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी कळंबोलीत शुक्रवारी पार पडलेल्या ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमप्रसंगी दिली.
राज्यात ३० वर्षांपासून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. प्रत्येक वर्षी आम्ही वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करतो. अपघातांची संख्या कमी करण्याचा आमचा उद्देश असला तरी गेल्या काही वर्षांत अपघातांचे प्रमाण चार टक्क्यांनी वाढल्याचे चन्ने यांनी सांगितले. सिग्नल तोडणे, मद्यपान करून वाहन चालवणे, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे यासारख्या विविध गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. कारवाईत ९० दिवसापर्यंत परवाने रद्द करण्यात आले आहेत. रस्ते अपघाताचा परिणाम देशाच्या जीडीपीवर होतो. अपघातांमुळे देशाचा तीन टक्के जीडीपी दर कमी होत असल्याचे चन्ने यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाला वाहतूक नियमांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची विनंती परिवहन विभागाने केली आहे.
कळंबोली येथील अभियानात अभिनेते वैभव मांगले यांनीदेखील वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन सर्वांना केले. सध्याच्या घडीला सामाजिक भान हा महत्त्वाचा घटक आहे. पालक जेव्हा दुचाकी किंवा कारने पाल्याला शाळेत सोडायला येतात, तेव्हा त्यांनी हेल्मेट व सीटबेल्ट लावणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलांवर नकळत संस्कार होतात. ज्याप्रमाणे आपण घराची निगा राखतो, तशीच पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, असे मार्गदर्शन मांगले यांनी केले.
कळंबोली येथील सुधागड हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्र माला वाहतूक पोलिसांसह विविध सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
यामध्ये पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, नवी मुंबई वाहतूक उपायुक्त सुनील लोखंडे आदी उपस्थित होते.
अबोली रिक्षा व बाईक रॅली
कळंबोलीतील जनजागृती अभियानाचा भाग म्हणून कळंबोली सुधागड हायस्कूल या ठिकाणाहून ४० पेक्षा जास्त अबोली रिक्षाचालक महिला व दुचाकी रॅली या वेळी काढण्यात आली. हेल्मेट जनजागृती व वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.