उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र मतदारांसमोर खुले
By admin | Published: May 23, 2017 02:13 AM2017-05-23T02:13:14+5:302017-05-23T02:13:14+5:30
महापालिका निवडणुकीमधील प्रत्येक उमेदवाराची आर्थिक, शैक्षणिक, गुन्हेगारीविषयीची माहिती निवडणूक विभागाने सार्वजनिक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीमधील प्रत्येक उमेदवाराची आर्थिक, शैक्षणिक, गुन्हेगारीविषयीची माहिती निवडणूक विभागाने सार्वजनिक केली आहे. मतदारांना त्यांच्या उमेदवारांविषयी वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांकडूनही याचे स्वागत करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना अर्ज भरताना त्यांच्या सांपत्तिक, शैक्षणिक व गुन्हेगारीविषयी प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवार प्रतिज्ञापत्र सादर करतात, परंतु त्याची प्रत फक्त निवडणूक विभागाकडेच उपलब्ध असते. अनेक वेळा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, इंडिया इलेक्शन वॉचसारख्या सामाजिक संस्था उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र मतदारांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्यालाही मर्यादा येत असतात. सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्ती नसलेले उमेदवार, सर्वाधिक शिक्षण व सर्वात कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांचीच नावे प्रसारमाध्यमांमधून पुढे येत असतात. सर्वच उमेदवारांची माहिती मतदारांना मिळत नाही. यामुळे पनवेल व भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक विभागाने सर्वच उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, त्याच्या कुटुंबीयांची संपत्ती, त्यांच्यावर असणारे कर्ज, दाखल गुन्ह्यांची माहिती याची यादीच वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीच्या स्वरूपात प्रसिद्ध केली आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारे प्रयोग करण्यात आला असून नागरिकांनीही त्याचे स्वागत केले आहे. प्रत्येक मतदाराच्या हातामध्ये सर्वच्या सर्व उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र आहे. यामुळे मतदान करताना नक्की कोणाला करायचे, उमेदवारांची आर्थिक स्थिती पाहून मतदान करायचे की त्याचे शिक्षण व प्रत्यक्ष जनसंपर्क पाहून लोकप्रतिनिधी निवडायचा हे ठरविण्यास मदत होणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
निवडणूक विभागाने मागील काही वर्षांमध्ये कामकाजामध्ये पारदर्शकता यावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. पूर्वी उमेदवारांना त्यांचे प्रतिज्ञापत्र हाताने लिहावे लागत होते. एकूणच ही प्रणाली किचकट असल्याने उमेदवारांनाही अडचणींचे होते. प्रतिज्ञापत्र पाहण्यासाठी नागरिकांनाही त्रासदायक होते. यामुळे निवडणूक विभागाने आॅनलाइन यंत्रणेमध्ये सुधारणा केली आहे. संकेतस्थळावर प्रतिज्ञापत्र पाहणे व समजून घेणे सोपे झाले होते.
सर्वच नागरिकांना संकेतस्थळावर जावून प्रतिज्ञापत्र पाहता येत नाही. यामुळे पनवेल व भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीच्या स्वरूपात प्रसिद्ध केले आहे.