एपीएमसीमधील मतांवर उमेदवारांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 11:53 PM2019-04-15T23:53:54+5:302019-04-15T23:54:11+5:30
मुंबई बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांसह व्यापारी, वाहतूकदार व इतर घटक मिळून तब्बल सव्वा लाख नागरिकांना रोजगार मिळाला आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांसह व्यापारी, वाहतूकदार व इतर घटक मिळून तब्बल सव्वा लाख नागरिकांना रोजगार मिळाला आहे. निवडणुकीमध्ये अनेक मतदार संघांमध्ये येथील नागरिकांची भूमिका निर्णायक ठरत असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी व उमेदवारांनी या परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे. रॅलींसह बैठकांचे प्रमाणही वाढले आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. वर्षाला ७ ते ८ हजार कोटी रुपयांची उलाढाल येथील पाच मार्केटमधून होत आहे. २५ हजारपेक्षा जास्त माथाडी कामगार, रोजंदारीवर काम करणारे १० हजारपेक्षा जास्त कामगार याठिकाणी काम करत आहे. जवळपास दहा हजार व्यापारी, त्यांच्याकडे काम करणारे मेहता कर्मचारी व इतर मदतनीस, ५ हजारपेक्षा जास्त वाहतूकदार, हजारो खरेदीदार, हॉटेल व इतर स्टॉल्स व मार्केटवर अवलंबून असलेल्यांची संख्या जवळपास सव्वा लाख आहे. प्रमुख आर्थिक केंद्र असलेली बाजार समिती महत्त्वाचे राजकीय केंद्रही बनले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ७ पेक्षा जास्त नगरसेवक एपीएमसीशी संबंधित आहेत. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, जुन्नर मतदार संघाचे आमदार शरद सोनावणे यांचे कार्यक्षेत्रही एपीएमसी आहे. माजी आमदार व सातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचे कार्यक्षेत्रही याच ठिकाणी आहे. मसाला व धान्य मार्केटमधील व्यापारी व संघटनांचे पदाधिकारी यांचे भाजपासह विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे चांगले संबंध आहे. ठाणे, सातारा, शिरुरसह अनेक लोकसभा मतदार संघामध्ये बाजार समितीमधील व्यापारी व कामगारांची मते निर्णायक ठरत आहेत. येथील काही कामगार व व्यापारी ग्रामीण भागामध्ये त्यांच्या गावचे प्रतिनिधित्व करत आहेत. फक्त मतदार म्हणून नाही तर कार्यकर्ते म्हणून येथील कामगारांची व इतर घटकांची भूमिका निर्णायक ठरू लागली आहे.
बाजार समितीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाल्यामुळे विविध पक्षाच्या नेत्यांनी बाजार समितीमध्ये संपर्क वाढविला आहे. सातारा, शिरुर मतदार संघामधील उमेदवारांनी येथील कार्यकर्त्यांना ‘गावाकडे चला’चे आवाहन केले आहे. व्यापारी व कामगार सर्वांनीच निवडणुकीपर्यंत जेवढा शक्य होईल तेवढा वेळ प्रचारासाठी द्यावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ठाणे मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे व राष्ट्रवादी काँगे्रसचे आनंद परांजपे यांनीही बाजार समितीमधील विविध घटकांवर लक्ष केंद्रित केले असून त्यांची मते मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
।शिवसेनेने काढली रॅली
सोमवारी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी बाजार समितीमधील भाजी, फळ, कांदा-बटाटा व इतर मार्केटमधून रॅली काढली. येथील कामगारांसह व्यापाऱ्यांशी संवाद साधला. सर्वांच्या समस्या समजून घेवून सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नवी मुंबईमधील पदाधिकारी व नगरसेवकही उपस्थित होते.
>राष्ट्रवादी काँगे्रसचीही रॅली
मंगळवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार आनंद परांजपे भाजी, फळ व कांदा -बटाटा मार्केटला भेट देणार आहेत. येथील सर्व घटकांशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक विंगमध्ये जावून व्यापारी व कामगारांची भेट घेणार आहेत. याशिवाय मार्केटशी संबंधित इतर घटकांशीही संवाद साधणार असून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
>‘गावाकडे चला’चे आवाहन
माथाडी नेते व शिवसेनेचे सातारा मतदार संघाचे उमेदवार नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँगे्रसचे कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, शिरुर मतदार संघामधील शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रसचे पदाधिकारी यांनीही बाजार समितीमधील कामगारांसह व्यापाऱ्यांना गावाकडे चलाचे आवाहन केले आहे. निवडणुकीमध्ये फक्त मतदार म्हणून नाही तर कार्यकर्ते म्हणून काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
>उलट-सुलट प्रतिक्रिया
मुंबई बाजार समितीसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शासनाच्या धोरणांचा फटका येथील कामगार व व्यापाºयांना बसू लागला आहे. व्यापार टिकविण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी काहीच प्रयत्न न करणारेही काही नेते निवडणुकांच्या काळात मार्केटमध्ये येवून आश्वासनांचा पाऊस पाडतात. अशांविषयी व्यापाºयांसह कामगारांनीही नाराजी व्यक्त केली आहे. जे नेहमीच मदतीला येतात त्यांनाच साथ द्या, असे आवाहनही केले जात आहे.