नारायण जाधव
नवी मुंबई : महाविकास आघाडीने साताऱ्यातून माथाडी नेते आ. शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीकडून छत्रपती उदयनराजे, नरेंद्र पाटील इच्छुक आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या ऐरोली आणि बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघांसह मावळ लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या उरण आणि पनवेल या विधानसभा मतदारसंघांत माथाडी कामगारांची संख्या ५० हजारांवर आहे. यापैकी बहुतेक कामगार मतदानासाठी गावी जातील. ठाणे, मावळ मतदार संघांतील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.
ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि उरण या चारही विधानसभा मतदारसंघांतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा, भाजीपाला मार्केट, फळ मार्केट, साखर-मसाला मार्केटसह दाणा बंदर या पाच बाजारपेठा, एमआयडीसीतील विविध कंपन्या, शीतगृह, कळंबोलीतील स्टील मार्केट, सीडब्ल्यूसीची गोदामे, उरणच्या जेएनपीए बंदरातील विविध टर्मिनल, कंटेनर यार्डमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांची संख्या मोठी आहे. हे कामगार पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील आहेत. त्यातही सातारा लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या कऱ्हाड, पाटण, जावळी या विधानसभा क्षेत्रांतील गावागावांचे मूळ रहिवासी आणि नवी मुंबईत राहणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे.
सातारा जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक असली की माथाडी कामगार मूळगावी धाव घेतात. लोकसभेपेक्षा माथाडी कामगार विधानसभा निवडणुकीच्या वेळी जास्त प्रमाणात गावी जातात. यावेळी माथाडी नेत्याला उमेदवारी मिळाल्याने गावी जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असू शकते. यामुळे ठाणे, मावळच्या सर्व उमेदवारांना नक्कीच डोकेदुखी होऊ शकते.- नरेंद्र पाटील, सरचिटणीस, माथाडी युनियन