राजकारण करून कोरोनाची लढाई जिंकू शकत नाही - फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 02:15 AM2021-05-03T02:15:19+5:302021-05-03T02:15:38+5:30
कोरोनाच्या संकटकाळात उलवे नोडमधील आरोग्यसेवेची पोकळी भरून काढण्याचे काम केल्याबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडे बोटे दाखवायची. माहिती नसताना राजकीय विधाने करायची. राजकारण करून कोरोनाची लढाई आपण लढू शकत नाही. तुमची लढाई कोविडशी असली पाहिजे. भाजपशी नाही, पंतप्रधान मोदींशी नाही. मोदी तर तुम्हाला सोबत घेऊन कोविडशी लढाई लढताहेत. मात्र, तुम्हाला यात राजकारण करायचेय. हे कृपया बंद करा. आज ज्या प्रकारे केंद्र सरकार मदत करतेय. त्यातून महाराष्ट्र पुन्हा एकदा या संकटात उभा राहतोय, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (२) उलवे येथील ६० बेडच्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी केले.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने तसेच ग्रामस्थ मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या सहयोगातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोडमधील कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात उभारण्यात आलेल्या ६० बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनाच्या संकटकाळात उलवे नोडमधील आरोग्यसेवेची पोकळी भरून काढण्याचे काम केल्याबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. या कार्यक्रमप्रसंगी माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री व आमदार आशिष शेलार, माजी राज्यमंत्री व आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, बीव्हीजी समुहाचे हणमंतराव गायकवाड, साई देवस्थानचे विश्वस्त रवी पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.