- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
पडझड होत असल्यामुळे कोपरखैरणेतील पोस्ट कार्यालय एनएमएमटीच्या डेपोतील कँटीनमध्ये हलवण्याचा घाट सिडकोने चालवला आहे. पोस्टाची सध्याची जागा सिडकोची असून ती भाडेतत्त्वावर घेण्यात आलेली आहे. त्याठिकाणी पडझड सुरू असल्यामुळे डागडुजीची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे पोस्टाला पर्यायी कँटीनची चावी देण्यात आलेली आहे.सेक्टर ६ येथील गणेश मार्केट इमारतीच्या एका भागात १५ वर्षांपासून पोस्ट कार्यालय सुरू आहे, तर उर्वरित भाग पोलीस ठाण्याला वापराकरिता देण्यात आलेला आहे. ही इमारत सिडकोने मार्केटसाठी विकसित केलेली असून नियोजनाच्या अभावामुळे अनेक वर्षे पडीक राहिलेली ही जागा भाडेतत्त्वावर देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीला त्याठिकाणी प्लॅस्टर कोसळण्याच्या घटना घडत असून याचा सर्वाधिक फटका पोस्ट कार्यालयाला बसत आहे. भिंतींना पाण्याचा पाझर फुटल्यामुळे पोस्टाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. चार दिवसांपूर्वीच त्याठिकाणी छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना देखील घडलेली आहे. सुदैवाने यामध्ये कोणाला दुखापत झालेली नसली, तरी भविष्यात त्याठिकाणी मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.सदर इमारतीची डागडुजी व्हावी याकरिता सन २००९ पासून पोस्टाचे अधिकारी सिडकोकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र प्रत्येक वेळी थातूरमातूर कामे झाल्यामुळे त्याठिकाणची पडझड थांबलेली नाही. अखेर पुन्हा एकदा त्याठिकाणी प्लास्टर कोसळल्याची घटना घडल्यानंतर सिडकोने भर पावसात डागडुजीचे काम हाती घेतले आहे. हे काम पूर्ण होण्यास एक महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे. यामुळे पोस्टातील संगणकीय कामकाज वाशीतील कार्यालयात हलवण्यात आले आहेत. परंतु नागरिकांची गैरसोय होवू नये याकरिता टपाल वाटपाचे दैनंदिन काम उरकण्यासाठी सिडकोकडे पर्यायी जागेची मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी सिडको अधिकाऱ्यांनी पोस्टासाठी कोपरखैरणेतील एनएमएमटी डेपोतील कँटीनची जागा सुचवत त्याची चावी देखील सोपवली आहे. डागडुजीच्या कालावधीत पोस्टाचे संपूर्ण कामकाज वाशीला हलवल्यास नागरिक व पोस्टमन या दोघांचीही गैरसोय होणार आहे. त्यामुळे कोपरखैरणे विभाग कार्यालयातील मोकळी जागा त्यांना तात्पुरती वापराकरिता त्यांनी मागितली होती. त्याऐवजी कँटीनच्या जागेचा प्रस्ताव सिडकोने पुढे केल्याचा संताप त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.पोस्टात प्लास्टर कोसळल्याचे समजताच खासदार राजन विचारे यांनी त्याठिकाणी भेट देवून पाहणी केली. त्यांनी डागडुजीच्या काळासाठी पोस्टाचे कार्यालय इतरत्र हलवण्याचे आदेश सिडकोला दिले. तसेच ऐरोलीत लवकरच पोस्टाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन होणार असल्याचेही सांगितले. यावेळी सिडकोकडून पोस्टासाठी कँटीनची जागा दिली जात असल्याचे सांगण्याचा प्रयत्न पोस्टाचे कर्मचारी करत असतानाच विचारे यांनीच त्यांना बोलण्यापासून थांबवले. त्यामुळे पाहणी दौऱ्यातून त्यांनी नेमके काय साधले, अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.पोस्टापासून काही अंतरावरच सिडको वसाहतीमध्ये प्लास्टर कोसळल्याची गंभीर घटना बुधवारी सकाळी घडली. खासदार विचारे यांनी त्याठिकाणी पाहणीसाठी यावे याकरिता शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक रामदास पवळे त्यांना विनवण्या करत होते. परंतु पोस्ट कार्यालय व पोलीस ठाण्याची पाहणी झाल्यानंतर खासदार विचारे यांनी त्याठिकाणी जायचे टाळून त्याच मार्गाने नेरुळच्या दिशेने ताफा वळवला. नागरिकांसह शिवसैनिकांनी या प्रकाराची नाराजी व्यक्त केली आहे.कोपरखैरणेत सिडकोच्या जागेत भाडेतत्त्वावर पोस्ट कार्यालय चालवले जात आहे. सदर इमारतीमध्ये अनेक वर्षांपासून पडझड होत आहे. याबाबत २००९ सालापासून सिडकोकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु प्रत्येक वेळी केलेल्या उपाययोजनेनंतरही पाणी गळती व प्लास्टर कोसळण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.- गौरव सिखला, वरिष्ठ पोस्ट अधिकारी