नवी मुंबई : महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चुकीचा भूगोल शिकविला जात आहे. शाळेच्या भिंतीवर काढलेल्या देशाच्या नकाशातून दिल्ली व राज्याच्या नकाशातून मुंबई वगळण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्याच्या नकाशामध्ये पालघरचाही समावेश केला आहे. याप्रकरणी पालिका प्रशासन व नकाशा काढणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने जिल्हा परिषदेच्या काळातील शाळा पाडून त्याठिकाणी अद्ययावत इमारती बांधल्या आहेत. नवीन इमारती बांधल्यानंतर शाळेच्या भिंतीवर विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी भारताचा, महाराष्ट्राचा, ठाणे जिल्हा व नवी मुंबईचा नकाशा रेखाटण्यात आला आहे. यासाठी चित्रकाराला लाखो रूपये मानधन दिले आहे. परंतु सदर चित्रकाराने काढलेला नकाशा योग्य आहे का हे शिक्षण मंडळाने तपासून न पाहता त्याला त्याचा मोबदला दिला आहे. लोकमतने यापूर्वी नेरूळ व सानपाडा शाळांमधील चुकीच्या नकाशाविषयी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तेथील नकाशे बदलण्यात आले. परंतु इतर ठिकाणी अद्याप दुरूस्ती करण्यात आलेली नाही. शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले व संतोष नेटके यांनी एमआयडीसी व झोपडपट्टीमधील शाळांची पाहणी केली असता देशाच्या नकाशामध्ये दिल्लीचे नाव व ठिकाण दर्शविण्यात आलेले नाही. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये मुंबईचे स्थान व नाव कुठेच दिसले नाही. ठाणे जिल्ह्याचा नकाशाही जुनाच आहे. पालघर जिल्हा वेगळा झाल्यानंतरही त्याचा अंतर्भाव ठाणे जिल्ह्यातच करण्यात आल्याचे निदर्शनास आले. महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चुकीचा भूगोल शिकविला जात आहे. जाणीवपूर्वक नकाशामध्ये चुका ठेवल्या असण्याची शक्यता वर्तविली जात आहे चित्रकाराने नकाशा काढल्यानंतर तो बरोबर आहे का याची खात्री प्रशासनाने घेतली पाहिजे होती. अनेक वर्षांपासून शाळेच्या भिंतीवर चुकीचे नकाशे दिसत आहेत. परंतु शाळेतील शिक्षकांनीही याकडे कधीच लक्ष दिलेले नाही. विद्यार्थी नकाशे पहात असताना त्यांना या चुका निदर्शनास येवू लागल्या आहेत. आमच्या शाळेच्या नकाशात मुंबईच नाही. देशाच्या नकाशात दिल्लीच नसल्याचे बाहेर बोलत आहेत. पालिकेच्या शिक्षण मंडळाचे सर्व ठिकाणी वाभाडे निघत आहे. शाळेला भेट देणाऱ्या नागरिकांच्याही या चुका लक्षात येवू लागल्या आहेत. परंतु शाळेतील शिक्षक, शिक्षण अधिकारी यांना या चुका का दिसत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांपर्यंत चुकीची माहिती पोहचविली जात असल्याचा आरोपही आता दक्ष नागरिक करत आहेत. (प्रतिनिधी)महापालिकेच्या शाळांच्या भिंतीवरील देशाच्या व राज्याच्या नकाशातून राजधानीला वगळण्यात आले आहे. हा देशाचा व राज्याचा अवमान आहे. चुकीचा नकाशा रेखाटणारे चित्रकार व याला जबाबदार असणारे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह इतर सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही पोलीस आयुक्तांकडे केली आहे. - महेश कोठीवाले,शाखाप्रमुख शिवसेना
देशासह राज्याच्या नकाशातून राजधानी वगळली
By admin | Published: February 01, 2016 1:45 AM