‘पर्यटन पर्व’ महोत्सवात चमकले कैपत नृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 03:26 AM2018-10-01T03:26:38+5:302018-10-01T03:27:06+5:30
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य : देशभरातील विविध लोककलांचा सहभाग; हस्तकला, पाककला, चित्रकला स्पर्धा
नवी मुंबई : पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी येथील कलांगणामध्ये जागतिक पर्यटन दिनानिमित्त ‘पर्यटन पर्व’ महोत्सव पार पडला. याप्रसंगी नवी मुंबई परिसरातील कैपत नृत्याने चांगलीच वाहवा मिळविली. या वेळी देशभरातील विविध राज्यातील लोककलाही सहभागी झाल्या होत्या. दोन दिवसीय महोत्सवामध्ये लोककला, हस्तकला, पाककलासह चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राची लोककला असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कैपत नृत्यातील धडाकेबाज ढोलाने परिसर दणाणून सोडला.
तसेच यावेळी आसामचा बिहू, सिक्कीमचा सिंगी छाम, गुजरातचा गरबा, राजस्थानचा कळबेलिया, मिझोरामचा चेराबांबू नृत्य, तामिळनाडूचा कराकट्टम आणि महाराष्टÑातील बैलपोळा व लावणी आदी सांस्कृतिक लोककला सादर करण्यात आल्या. यावेळी देशातील विविध राज्यांच्या पर्यटन सुविधांची माहिती देणारे स्टॉलही उभारण्यात आले होते. याप्रसंगी पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी भेट दिली. या वेळी पर्यटन खात्याच्या मुंबई विभागाच्या विभागीय संचालक नीला लाड यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, केटरिंग कॉलेजचे प्राचार्य ए. के. सिंग यांच्यासह विविध कलापथकांचा तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. या महोत्सवासाठी मुंबईसह परिसरातील कलाप्रेमी रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद देत उपस्थिती दाखविली.
कैपत नृत्याची वाहवा
च्कैपत नृत्याला गजनृत्य असेही म्हटले जात असून, महाराष्टÑातील एक प्रमुख लोककला आहे. इंग्लंड व रशिया येथे कैपत नृत्य सादर करून दोन वेळा भारताचे प्रतिनिधित्व करत वाहवा मिळविली. तसेच यातील ज्येष्ठ कलाकारांना १९५८ साली दिल्ली येथे तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू यांच्याकडून सन्मानित करण्यात आले होते.