तोतया आमदाराची कार जप्त, कारवर विधानसभेच्या लोगोचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:02 AM2018-07-17T02:02:54+5:302018-07-17T02:03:03+5:30
विधानसभेच्या लोगोचा वापर करून आमदार असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवी मुंबई : विधानसभेच्या लोगोचा वापर करून आमदार असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर कार खारघर परिसरात संशयास्पद फिरताना वाहतूक पोलिसांना संशय आला. त्यानुसार कार चालकाकडे चौकशी केली असता, तो तोतया आमदार असल्याचे समोर आले.
टोल नाक्यावर प्राधान्य मिळावे, तसेच जनसामान्यांमध्ये प्रतिमा उंचावी यासाठी अनेक जण शक्कल लढवत असतात. परंतु विधानसभेचा लोगो वापरून आमदार बनून मिरवणाºयाला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो वापरत असलेल्या (एमएच ०३ बी.वाय. ७००२) कारच्या काचेवर पुढे व मागे विधानसभेचा लोगो लावण्यात आलेला आहे. शिवाय कारच्या काचा देखील काळ्या करण्यात आलेल्या आहे. सदर कार खारघर परिसरात सातत्याने फिरत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी चालकाची चौकशी केली. यावेळी कारचा मालक वेगळा असून कारमधील व्यक्ती त्याचा चालक असल्याचे समोर आले. त्याच्या चौकशीत कारचा मालक आमदार नसतानाही त्याने कारवर विधानसभेचा लोगो वापरल्याचे उघड झाले. यानुसार वाहतूक पोलिसांनी तोतया आमदाराच्या चालकासह त्याची कार खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सदर कारचा एखाद्या गुन्ह्यासाठी वापर झाला असता, तर पोलिसांपुढील तपासाच्या अडचणी वाढल्या असत्या. खारघर पोलीस या तोतया आमदाराचा अधिक तपास करत आहेत.