कर्जत-कल्याण राज्यमार्गावर नेरळ येथे कारला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:14 PM2021-02-25T23:14:46+5:302021-02-25T23:14:55+5:30
नेरळ : कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील नेरळ-जिते गावाजवळ स्कोडा कारचा अपघात झाला आहे. वाहनचलकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट रस्त्यालगत ...
नेरळ : कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील नेरळ-जिते गावाजवळ स्कोडा कारचा अपघात झाला आहे. वाहनचलकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट रस्त्यालगत असणाऱ्या नैसर्गिक नाल्याच्या सुरक्षा कठड्यावरून खड्डयात पडले. सुदैवाने या अपघातात वाहनचालक थोडक्यात बचावला असून, वाहनचालकाने स्वतः नेरळ पोलीस ठाण्यात हजर राहून अपघाताची माहिती दिली आहे. बुधवारी मध्यरात्री हा अपघात घडला आहे.
कर्जतहून अंबरनाथच्या दिशेने निघालेल्या या वाहनचालकाचा बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास नेरळ-जिते गाव येथील वळणावर अचानक ताबा सुटला. कार वेगात असल्याने रस्त्यालगत असणाऱ्या नैसर्गिक नाल्याच्या साईड कठड्यावर कार जाऊन आदळल्याने ती नाल्याच्या बाजूला उलट्या अवस्थेत पडली आहे. दैव बलवत्तर आणि गाडीतील एअर बॅग उघडल्याने वाहनचालक थोडक्यात बचावला. यावेळी वाहनचालकासोबत कोणी नसल्याने चालकाने नेरळ पोलीस ठाणे गाठून अपघाताची माहिती दिली.
प्रथमदर्शनी हा अपघात वाहनाचा टायर फुटल्याने झाल्याचा अंदाज वर्तविला जात असून, वाहनचालक वेगात असल्याने चालकाला
वाहनावरील ताबा मिळवता न आल्याने अपघात घडला. कर्जत-कल्याण हा राज्यमार्ग वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असून, दोन महिन्यांत राज्य मार्गावर जवळपास २० अपघात झाले आहेत. यामध्ये वाहनाचा समोरासमोर अपघात तसेच वाहनांची पादचारी व्यक्तींना मागून ठोकर, तर वाहनाला अचानक लागलेल्या आगीच्या घटना समोर आल्या आहेत. या राज्य मार्गावर अपुऱ्या सुविधा तसेच काही सूचना फलकांच्या अभावामुळे अपघात घडत आहेत. आतापर्यंत कर्जत-कल्याण राज्यमार्गवर नेरळ ते डिकसळ भागात दोन तरुणांना अपघातात आपला जीवदेखील गमवावा लागला आहे.