वैभव गायकर
पनवेल - गाडीत लाल दिवा ठेवून समाजात आपले वेगळे प्रस्त निर्माण करण्याचा प्रयत्न एका वाहनचालकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यांनतर देखील पनवेलमध्ये सर्रास गाडीत लाल दिवा बाळगणाऱ्या वाहन चालकाला प्रादेशिक परिवहन विभागाने नोटीस जारी करत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वाहनाची नोंदणी निलंबित करण्याचे पत्र दिले आहे.
पनवेल शहरात वाहन क्रमांक एमएच ४६ बी ए ३७५५ या क्रमांकाच्या गाडीत अंबर दिवा व महाराष्ट्र शासनाची पाटी ठेवून फिरत असल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहे. अंबर दिवा बाळगण्यासंदर्भात नियमावलीत अनेक बदल तर झालेच आहेत. विशेष म्हणजे १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यासंदर्भात पनवेल महानगर पालिकेचे उपायुक्त व पनवेल विधानसभा मतदार संघ आचारसंहिता प्रमुख जमीर लेंगरेकर यांना तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत त्यांनी त्वरित उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांना यासंदर्भात माहिती दिली. पाटील यांनी या प्रकाराची दखल घेत संबंधित वाहन क्रमांकाच्या आधारे गाडी मालकाला नोटीस बजावली आहे. मोटर वाहन कायदा १९८८ च्या कलम ५३ मधील तरतुदीनुसार तीन महिन्यांसाठी वाहनाची नोंदणी निलंबित का करू नये ? यासंदर्भात गाडी मालकाकडून खुलासा मागितला आहे. संबंधित गाडीचा मालक राठोड नामक व्यक्ती असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी अशीच घटना खारघर शहरात घडली होती. खासदाराच्या नावाखाली खारघर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना लाल दिव्याचा धाक दाखविणाऱ्या वाहन चालकावर खारघर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याच्या हेतूने आम्ही वाहनांची चौकशी करत आहोत. आमच्या निदर्शनास आलेल्या दोषींवर आम्ही कारवाई करू अशी प्रतिक्रिया यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.