नवी मुंबई : कारच्या विक्रीसाठी केलेल्या आॅनलाइन जाहिरातीच्या आधारे कारची टेस्ट ड्राइव्ह घेण्याच्या बहाण्याने कार पळवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.कोपरखैरणे येथे राहणाऱ्या विकास तागरा यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांच्याकडे मामाच्या मुलाची कार वापरासाठी ठेवण्यात आली होती. सदर कार विकण्यासाठी एका या आॅनलाइन पोर्टलवर शनिवारी जाहिरात करण्यात आली होती, त्यानुसार दिवा येथील गणेश नवले नावाच्या व्यक्तीने शनिवारी रात्री त्यांना फोनवर संपर्क साधला. या वेळी कोपरखैरणे रेल्वेस्थानकासमोरील जागेत दोघांची भेट झाली असता, नवले याने कारची टेस्ट ड्राइव्ह घ्यायची असल्याचे सांगितले. या वेळी तागरा यांनीही कारमध्ये सोबत बसतो असे सांगितले असता, नवले याने त्यांना सोबत बसण्यास नकार दिला होता. तर स्वत:चा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स त्यांच्याकडे दिली होती. यामुळे तागरा यांनी त्याला कार घेऊन जाऊ दिले असता, तो परत आलाच नाही. यामुळे आपली कार चोरीला गेल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार कोपरखैरणे पोलीसठाण्यात गणेश धोंडीराम नवले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.>कार विकण्यासाठी एका आॅनलाइन पोर्टलवर जाहिरात करण्यात आली होती, त्यानुसार संपक साधल्यावर ट्रेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने कार पळवली.
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने कार पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:40 PM