विशेष प्रतिनिधी लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : अलिबाग-पेण राज्य मार्गावरील कार्लेखिंड या घाटाच्या टप्प्यात सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले असून, कार्लेखिंड घाट रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. शनिवारी दुपारी कार्लेखिंडीत झालेल्या वाहन अपघातामुळे दुपारी चार वाजेपर्यंत येथे मोठी वाहतूककोंडी झाली होती. रस्ता अरुंद असल्याने ओव्हरटेक करताना वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने येथे अपघात होत आहेत. मुंबई-पुण्याकडून येवून अलिबाग, काशिद, मुरुडकडे जाणारी व येणारी वाहने, उसर येथील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या कारखान्यात येणारी व जाणारी अवजड वाहने, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषदेत येणारी व जाणारी वाहने, एसटी बसेस, खासगी बसेस अशी मोठ्या प्रमाणावर किमान ५०० ते ५५० वाहनांची ये-जा या कार्लेखिंडीमधून दररोज होत असते. या पार्श्वभूमीवर येथील रस्ता रुंदीकरण झाल्यास अपघात रोखण्यात यश येण्याची शक्यता आहे.
अलिबागजवळ कार्लेखिंडीतील अपघातांत वाढ
By admin | Published: May 23, 2017 2:10 AM