पालिका क्षेत्रातील पक्षी-प्राण्यांसह दुर्मीळ वनस्पतींचे होणार संगोपन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 11:59 PM2019-11-21T23:59:42+5:302019-11-21T23:59:46+5:30
जैवविविधता नियंत्रण समितीची स्थापना; ठाण्याच्या धर्तीवर बायोडायव्हर्सिटी गार्डन तयार करण्याचे उद्देश
- वैभव गायकर
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रजातीच्या वनस्पती, भातपीक, प्राणी, कीटक, मॅन्ग्रोस आदीचे पालिकेच्या मार्फत संगोपन केले जाणार आहे. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या महासभेत जैवविविधता नियंत्रण समिती स्थापन करण्यासंदर्भात महासभेत मंजुरी मिळाली आहे.
शासनाच्या जैवविविधता अधिनियम २००८ नुसार अशाप्रकारे समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेला संबंधित समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संबंधित समितीची स्थापना लांबणीवर पडली होती. निवडणुकीनंतर पहिल्याच महासभेत हा विषय सभागृहासमोर आल्यावर या समितीच्या स्थापनेला सदस्यांनी हिरवा कंदील दिला. या समितीत सात नगरसेवक असणार आहेत. समितीचे अध्यक्षपद महापौरांकडे असणार आहे. तर आमदार, खासदार निमंत्रित सदस्य म्हणून या समितीत काम पाहणार आहेत. विशेष म्हणजे, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये आयुर्वेदाचार्य, पक्षितज्ज्ञ, प्राणितज्ज्ञ या व्यतिरिक्त कृषी अधिकारी, वनविभागाचे अधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत. पालिका क्षेत्रातील दुर्मीळ वनस्पती, प्राणी, भाताच्या जाती, मॅन्ग्रोस आदीसह सर्वप्रकारच्या जैवविविधता असलेल्या घटकांचे संगोपनाचे काम ही समिती पाहणार आहे. समितीचे सचिव म्हणून उपायुक्त संजय शिंदे हे काम पाहणार आहेत. यासंदर्भात शिंदे यांनी जैवविविधता समितीच्या कामाची पद्धत व कार्याची माहिती महासभेत उपस्थित नगरसेवकांना दिली. पनवेल शहर पूर्वीपासूनच जैवविविधता तसेच निसर्गाचे वरदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून शहरातील जैवविविधतेचे संगोपन होणार आहे. यासंदर्भात पालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या वनस्पती, प्राणी, भातशेती, पक्षी, वन्यजीव आदीच्या सर्वेक्षणाला लवकरात लवकर सुरु वात होणार आहे.
यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर वर्तकनगर या ठिकाणी सुमारे २७ एकरवर उभारण्यात आलेल्या बायोडायव्हर्सिटी गार्डनची उभारणी करण्याचा मानस पनवेल महानगरपालिकेचा असणार आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाने उपयुक्त संजय शिंदे यांच्यावर ही जबाबदारी आहे.
समितीत कोण कोण असणार
या समितीत सात नगरसेवक असणार आहेत. समितीचे अध्यक्षपद महापौरांकडे असणार आहे. तर स्थानिक आमदार, खासदार निमंत्रित सदस्य म्हणून या समितीत काम पाहणार आहेत. विशेष म्हणजे, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये आयुर्वेदाचार्य, पक्षितज्ज्ञ, प्राणितज्ज्ञ या व्यतिरिक्त कृषी अधिकारी, वनविभागाचे अधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत.
पालिका क्षेत्रातील दुर्मीळ वनस्पती, प्राणी, भाताच्या जाती, मॅन्ग्रोस आदीसह सर्वप्रकारच्या जैवविविधता असलेल्या घटकांचे संगोपनाचे काम ही समिती पाहणार आहे. उपायुक्त संजय शिंदे यांच्याकडे या समितीची सचिवपदाची जबाबदारी असणार आहे.
दुर्मीळ पक्षी, प्राणी, वनस्पतीची ओळख नागरिकांना होणार
आपण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती, पक्षी, प्राणी,भातशेती, कीटकनाशक आढळतात, याबाबत अनेक पर्यावरणतज्ज्ञांना कुतूहल असते.
यासंदर्भात या समितीद्वारे पालिका क्षेत्राचे सर्वेक्षण करून या घटकांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. दुर्मीळ घटकांच्या संवर्धनासाठी या समितीचे कामकाज चालणार आहे.
विकास करत असताना जैवविविधतेमधील सर्व घटकांचा समतोल राखणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने संबंधित समितीद्वारे पालिका क्षेत्रातील विविध घटकांचे संगोपन केले जाणार आहे. समिती नुकतीच स्थापन झाली आहे. प्रत्यक्ष कामालादेखील लवकरच सुरु वात होणार आहे.
- संजय शिंदे, सचिव, जैवविविधता नियंत्रण समिती
27 एकरवर उभारण्यात आलेल्या बायोडायव्हर्सिटी गार्डनची उभारणी करण्याचा पनवेल महानगरपालिकेचा मानस