ठाणे : कळवा-मुंब्रा हा पट्टा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात आहे. त्यानुसार, कळव्यात आता पाटील विरुद्ध साळवी असा काहीसा संघर्ष महापालिका निवडणुकीत पाहावयास मिळणार आहे. पालिकेने अर्जांची छाननी केल्यानंतर वैध ठरलेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक अर्ज हे पाटील आणि साळवी आडनावाचेच आहेत. यामध्ये ९ पाटील आणि ९ साळवी असे १८ उमेदवार कळव्यातून लढणार आहेत. कळव्यातील १६ जागांपैकी काँग्रेसने चारच जागांवर उमेवार रिंगणात उतरवले असल्याने कळव्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मागील निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर लढलेले उमेदवार या वेळीदेखील एकमेकांसमोर लढणार आहेत.कळवा पट्टा हा राष्ट्रवादीसाठी या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. या पट्ट्यातून राष्ट्रवादीला येथे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान आहे. असे असले तरी या पट्ट्यात आता आमदार जितेंद्र आव्हाड विरुद्ध माजी पालकमंत्री गणेश नाईक असा संघर्ष पेटला आहे. युद्धात राष्ट्रवादीच्या जागा कमी करण्यासाठी भाजपा, शिवसेना आणि मनसेने सर्वच ठिकाणी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. प्रभाग क्र मांक २३ मध्ये राष्ट्रवादीचे चारही विद्यमान नगरसेवकांविरोधात शिवसेना, भाजपा आणि मनसेने आपले उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या प्रमिला केणी आणि मुकुंद केणी यांच्याविरोधात भाजपाने पुन्हा माजी उपमहापौर अशोक भोईर आणि दीपा गावंड यांना उतरवले आहे. प्रभाग क्र मांक २५ मध्येदेखील राष्ट्रवादीने मनाली पाटील आणि महेश साळवी यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले आहे. प्रकाश बर्डे यांनाही रिंगणात उतरवले असून त्यांचा सामना शिवसेनेचे नगरसेवक आणि उपमहापौर राजेंद्र साप्ते यांच्याशी होणार आहे. प्रभाग क्र मांक ९ मध्ये राष्ट्रवादीच्या वतीने माजी नगरसेविका सुरेखा पाटील, शिवसेनेच्या सभागृह नेत्या अनिता गौरी आणि भाजपाच्या वतीने हर्षला बुबेरा, असा तिरंगी सामना रंगणार आहे. प्रभाग क्र मांक २४ मध्ये राष्ट्रवादीच्या वतीने मनीषा साळवी, अक्षय ठाकूर आणि शिवसेनेच्या वतीने पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या पूजा कारसुले या विद्यमान नगरसेवकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अक्षय ठाकूरविरोधात शिवसेनेचे सचिन म्हात्रे आणि राष्ट्रवादीचे सुरेंद्र उपाध्याय, तर माजी नगरसेवक आणि काँग्रेसमधून मनसेमध्ये आलेले सुभाष खारकर असा सामना रंगणार आहे. कळव्यातील लढती या काट्याच्या होणार असल्याचेच चित्र आहे. (प्रतिनिधी)
कळव्यात पाटील विरुद्ध साळवी सामना रंगणार
By admin | Published: February 06, 2017 4:23 AM