आभासी चलनाच्या गुंतवणुकीत फसवणूक, वाशीत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 03:59 AM2018-07-03T03:59:00+5:302018-07-03T03:59:08+5:30
आभासी चलनात गुंतवणुकीतून नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात नेरुळच्या व्यक्तीने ४ लाख १६ हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार केली आहे.
नवी मुंबई : आभासी चलनात गुंतवणुकीतून नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात नेरुळच्या व्यक्तीने ४ लाख १६ हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार केली आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेची परतफेड न करता बाजारमूल्य नसलेले चलन देवून संबंधितांनी त्यांची फसवणूक केली आहे.
पोलिसांनी सुमारे दीड वर्षापूर्वी नेरुळ येथील आभासी चलनाच्या प्रचारासाठी भरलेल्या सेमिनारवर कारवाई केल्यानंतरही शहरात असे सेमिनार सुरूच आहेत. नागरिकांना आभासी चलनात गुंतवणूक केल्यास जास्त नफा असल्याचे भासवून गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले जात आहे. त्याकरिता बिटकॉईनसह अनेक विदेशी कंपन्यांचे प्रतिनिधी देशभर सक्रिय आहेत. त्यांच्याकडून जागोजागी सेमिनार घेवून झटपट श्रीमंतीची दिवास्वप्ने दाखवून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले जात आहे. मात्र अशाच आमिषाला बळी पडलेल्या नेरुळच्या ज्ञानेश्वर गऊल यांची ४ लाख १६ हजारांची फसवणूक झाली आहे. त्यांनी खरेदी केलेल्या बिटकॉईनची संबंधितांनी परस्पर विक्री केली. यामुळे त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली असता त्यांना एमकॅप नावाचे बाजारमूल्य नसलेले चलन देवून फसवण्यात आले. याप्रकरणी गाऊल यांनी गुन्हे शाखा पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक व्ही. आर. रामुगडे अधिक तपास करत आहेत. अशा प्रकारे इतरही अनेकांच्या फसवणुकीची शक्यता आहे. त्यामुळे बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक झालेल्यांनी गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.