नवी मुंबई : वाशीतील पालिका रुग्णालयातून मृतदेह गहाळ झाल्याप्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. कोणत्या कलमांतर्गत व कोणावर गुन्हा दाखल करायचा या पेचात वाशी पोलीस आहेत. शवागारात एकाच पेटीत दोन मृतदेह ठेवल्याने ते नातेवाईकांच्या ताब्यात देताना घोळ झाल्याचे समोर आले.मृतदेहाप्रकरणी चौकशी समिती व वाशी पोलिसांनी केलेल्या तपासात नजरचुकीने मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समोर आले. या घोळामुळे उमरच्या मृतदेहावर हिंदू पद्धतीने अंत्यविधी झाल्याने नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मृतदेह गहाळ केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करम्ण्यासाठी मंगळवारी रात्रीपर्यंत तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात होता. त्याद्वारे बुधवारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.पालिका रुग्णालयातून उमर शेखचा (२९) मृतदेह गहाळ झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. उमरचा भाऊ मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेल्यावर हा प्रकार समोर आला. कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना कळवले होते. परंतु पश्चिम बंगालवरून नवी मुंबईत पोचण्यास त्यांना दोन दिवस लागले.याचदरम्यान दिघा येथील १८ वर्षीय मुलीचा मृतदेह चाचणीसाठी आणला. तिचा मृत्यू काविळीमुळे झाला. तिचाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तिच्याही नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बोलवले होते. रुग्णालयाच्या शवागारात मृतदेह ठेवण्यासाठी जागा नसल्याने हे दोन्ही मृतदेह एकाच पेटीत ठेवले होते. जेंव्हा दिघा येथील मयत मुलीचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात आले, त्यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मुलीऐवजी उमरचा मृतदेह दिला. तर कोरोनाच्या मृतदेह बंदिस्त ठेवण्याच्या सूचना नातेवाईकांना दिल्या होत्या. त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह थेट स्मशानभूमीत नेऊन अंत्यविधी उरकला.
मृतदेह गहाळ झाल्याप्रकरणी पालिकेविरोधात गुन्हा दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 3:34 AM