कॅटरिंग व्यवसाय आला डबघाईला; कामगारांची उपासमार, विवाह सोहळ्यातून मेन्यू गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:19 AM2021-03-24T00:19:32+5:302021-03-24T00:20:42+5:30

नवी मुंबईत ३०० हून अधिक छोटे मोठे कॅटरिंग व्यावसायिक आहेत. कोरोनामुळे एक वर्षांपासून अनेकांच्या हाताला काम मिळालेले नाही.

The catering business came to a screeching halt; Workers starve, menu disappears from wedding ceremony | कॅटरिंग व्यवसाय आला डबघाईला; कामगारांची उपासमार, विवाह सोहळ्यातून मेन्यू गायब

कॅटरिंग व्यवसाय आला डबघाईला; कामगारांची उपासमार, विवाह सोहळ्यातून मेन्यू गायब

Next

नवी मुंबई : लग्नसोहळ्याला ५० माणसांच्या असलेल्या मर्यादांमुळे हॉलमध्ये होत असलेल्या विवाह सोहळ्यातून जेवणाचा मेन्यू गायब झाला आहे. परिणामी शहरातील कॅटरिंग व्यवसाय डबघाईला आला असून, त्यामध्ये काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर उपस्थितांच्या संख्येची मर्यादा केवळ हॉलमधल्या सोहळ्यांवरच असून इतर ठिकाणी मात्र बेधडकपणे होत असलेल्या सोहळ्यावर कोणाचा अंकुश नसल्याची खंत व्यक्त होत आहे. 

नवी मुंबईत ३०० हून अधिक छोटे मोठे कॅटरिंग व्यावसायिक आहेत. कोरोनामुळे एक वर्षांपासून अनेकांच्या हाताला काम मिळालेले नाही. यामुळे कॅटरिंगमध्ये भाजी कापण्यापासून ते जेवण वाढण्याचे काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रत्येक व्यावसायिकाकडे २५ ते ३० कामगार आहेत. मात्र सध्या लग्न समारंभासाठी प्रशासनाने ५० माणसांची अटक घातली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे पंच पक्वान्नाच्या मेन्यूच्या मिळणाऱ्या ऑर्डर बंद झाल्या आहेत. तर ५० माणसांच्या जेवणासाठी कॅटरिंगला ऑर्डर देण्याचे वधूवर कुटुंबीयांकडून टाळले जात आहे. परिणामी कॅटरिंग व्यावसायिक व त्यावर आधारित कामगार यांच्यापुढील संकट सोडवण्यासाठी नवी मुंबई वेडिंग असोसिएशनमार्फत प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन लग्नासाठी ५० व्यक्तींमधून कॅटरिंगचे कामगार वगळण्याची मागणी केली आहे. परंतु लिखित आदेश होत नसल्याने अनेकांना छोटे कामदेखील मिळत नाही. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना साकडे घातले जाणार असल्याचे संघटना अध्यक्ष राजेश गौडा व खजिनदार कैलास मुद्रस यांनी सांगितले. यासंदर्भात सोमवारी कॅटरिंग व्यावसायिकांची बैठक झाली.

लग्नास ५० व्यक्तींची उपस्थितीचे आदेश प्रत्यक्षात केवळ हॉल व्यावसायिकांवर लादले जात आहेत. हॉल व्यतिरिक्त मोकळ्या मैदानात बेधडकपणे मोठी गर्दी होत आहे. यामुळे प्रशासनाकडून जे नियमांचे पालन करतात त्यांचीच गळचेपी होत असल्याचा आरोप होत आहे. कॅटरिंगमध्ये काम करणाऱ्या बहुतांश कामगारांचे हातावर पोट आहे. त्यांच्या हाताला रोजगार नसल्याने अनेकांपुढे उपासमारीची वेळ आली आहे. सुरुवातीचे काही दिवस व्यावसायिकांनी त्यांना थोडाफार आर्थिक आधार दिला. मात्र वर्षभर काम नसल्याने कॅटरिंग व्यावसायिक डबघाईला आले आहेत.

Web Title: The catering business came to a screeching halt; Workers starve, menu disappears from wedding ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.