जागावाटपाविषयी महाविकास आघाडीची सावध भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:17 AM2020-01-11T00:17:52+5:302020-01-11T00:17:55+5:30
माजी मंत्री गणेश नाईक यांना घेरण्यासाठी नवी मुंबईमध्येही महाविकास आघाडी करण्याचा निर्णय शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीने घेतला आहे;
नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांना घेरण्यासाठी नवी मुंबईमध्येही महाविकास आघाडी करण्याचा निर्णय शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीने घेतला आहे; परंतु जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. आघाडीमधील तीनही पक्षांनी स्वतंत्रपणे प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. जागावाटपाविषयी सुरू असलेल्या चर्चा, वृत्त व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून येथे माजी मंत्री गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. येथील राजकारणामध्ये नाईक विरुद्ध सर्व असेच चित्र नेहमी पाहावयास मिळते. यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये नाईकांना धक्का देण्यात विरोधकांना यश आले आहे; परंतु त्यांच्या ताब्यातून महापालिका हिसकावून घेणे अद्याप एकदाही शक्य झालेले नाही. या वेळी नाईक भारतीय जनता पक्षामध्ये असून, त्यांना शह देण्यासाठी येथेही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाणार आहेत.
राष्ट्रवादीचे प्रभारी शशिकांत शिंदे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक व इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन यापूर्वी प्राथमिक चर्चा केली आहे.
महाविकास आघाडी निश्चित असली तरी अद्याप त्यासाठी अधिकृतपणे कोणतीही कोअर कमिटी स्थापन झालेली नाही. जागावाटप करण्यासाठीचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. कोणता पक्ष किती जागांवर निवडणुका लढणार याविषयी अद्याप काहीही चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झालेली नाही.
सद्यस्थितीमध्ये प्रत्येक पक्षाने पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी झालीच तर कोणत्या प्रभागामध्ये आपल्या पक्षाकडे सक्षम उमेदवार आहे, याची माहिती घेतली जात आहे. प्रभागस्तरावरील कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेतल्या जात आहेत. शुक्रवारी काँग्रेसने ब्लॉक कमिटीच्या पदाधिकाºयांची बैठक घेऊन पदाधिकाºयांशी चर्चा केली. माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. समाजमाध्यमातून व प्रसारमाध्यमातून महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्यात येणार आहे. महाविकास आघाडी होण्यास काही अडचण नाही; परंतु याविषयी निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. जागावाटपाविषयी कोणतीही चर्चा झालेली नसून पदाधिकाºयांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सर्वांना केले आहे.
- विजय नाहटा,
उपनेते, शिवसेना