नवी मुंबई : रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. कडेवर तीन वर्षाच्या मुलाला घेऊन चाललेल्या महिलेला धक्का देऊन चोरट्याने तिचे मंगळसूत्र हिसकावले होते. यामध्ये महिला व तिचा लहान मुलगा जखमी झाला असतानाही महिलेने त्याला प्रतिकार करत आरडा ओरडा केला. त्यामुळे तिच्या मदतीला धावून आलेल्या नागरिक व पोलिसांनी पाठलाग करून चोरट्याला अटक केली.
योगिता गायकर (२७) असे धाडसी महिलेचे नाव असून ती रक्षाबंधनासाठी ऐरोली येथील माहेरी आलेली आहे. गुरुवारी रात्री त्या तीन वर्षाचा मुलगा देवांश याला घेऊन भाजी खरेदीसाठी ऐरोली सेक्टर ३ येथे आल्या होत्या. रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास त्या परत घरी जात असताना देवांश याला कडेवर घेतलेलं होत. त्याचवेळी चालत आलेल्या एका तरुणाने त्यांच्या गळ्यातले मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांनी त्याला प्रतिकार केला असता चोरट्याने त्यांना जोराचा धक्का देऊन मंगळसूत्र खेचून घेतले.
चोरट्याच्या धक्क्याने योगिता ह्या लहान मुलासह खाली कोसळल्या असता त्यात दोघेही जखमी झाले. यानंतरही त्यांनी चोरट्याचा पाठलाग करत आरोड ओरडा केला. यामुळे सदर मार्गाने जाणाऱ्या नागरिकांनी व पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. अखेर काही अंतरावर तो चोरट्या पोलिसांच्या हाती लागला. चौकशीत त्याचे नाव गणेश महादेव देसाई (२४) असून तो दिघा येथे राहणारा असल्याचे समोर आले. तसेच त्याच्याकडे योगिता यांचा चोरलेला ऐवज देखील आढळून आला. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेश याच्याकडून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.