सीबीडीतील भुयारीमार्ग राहणार तीन महिने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:20 PM2019-04-12T23:20:27+5:302019-04-12T23:20:33+5:30
मेट्रो स्थानकाचे काम : वाहनचालकांची होणार गैरसोय
नवी मुंबई : सीबीडी रेल्वे स्थानकानजीक मेट्रो स्थानक-१ चे काम करण्यासाठी रायगड भवनकडून सीबीडी रेल्वेस्थानकाकडे ये-जा करणारा भुयारीमार्ग तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे वाहनचालकांना वाहतूककोंडीचा त्रास होणार असून, गैरसोय टाळण्यासाठी भुयारीमार्ग आलटून पालटून बंद करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.
सीबीडी हे कार्यालयांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या नोडमध्ये कोकण भवन, सिडको भवन, पोलीस मुख्यालय, रायगड भवन, विविध आयटी कंपन्या, महापालिका मुख्यालय आदी शासकीय, खासगी कार्यालये मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे कामानिमित्त या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. नवी मुंबई शहरात मेट्रोचे काम सुरू आहे.
सीबीडी रेल्वेस्थानकापासून सुरू होणाऱ्या या कामात मेट्रो-१ चे स्थानक बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी रायगड भवन ते सीबीडी रेल्वेस्थानकादरम्यान असलेल्या भुयारीमार्गावरील ये-जा करणारे दोन्ही मार्ग तीन महिने आलटून पालटून बंद ठेवण्यात येणार आहेत. भुयारीमार्ग आलटून पालटून बंद राहणार असल्याने वाहनचालकांची गैरसोय टाळणार असली तरी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होणार आहे. सदर कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, याबाबतच्या सूचना वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.