सीबीएसई शाळेत समस्यांचा बोजवारा; ४८ तासांत गणवेश देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:16 AM2019-12-11T00:16:07+5:302019-12-11T00:16:29+5:30
शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या
नवी मुंबई : शहरातील विद्यार्थ्यांना सुविधा देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सीवूड येथील सीबीएसई शाळेत काही त्रुटी असून, विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत स्थानिक नगरसेवक विशाल डोळस यांनी पालकांसमवेत महापालिका मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. येत्या ४८ तासांत विद्यार्थ्यांना गणवेश न मिळाल्यास आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या पाल्यांनाही सीबीएसई शाळेत शिक्षण घेता यावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेने शहरात सीवूड आणि कोपरखैरणे येथे सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. सीवूड सेक्टर ५० येथील सीबीएसई शाळेत गेल्या अनेक महिन्यांपासून कुशल शिक्षक, विद्यार्थ्यांना गणवेश, विद्यार्थ्यांना सामान्य सुविधा, शिक्षण विभागाचे शाळा व्यवस्थापनावर अपेक्षित लक्ष, याकरिता अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या आहेत; परंतु प्रत्यक्षात कार्यवाही झाली नसल्याने सर्वच प्रश्न प्रलंबित आहेत.
महापालिकेचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभाग यांच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थी सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप नगरसेवक डोळस यांनी केला आहे. प्रशासनाच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी पालकांसोबत शिक्षण विभागाच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे ते म्हणाले. पुढील ४८ तासांत विद्यार्थ्यांना गणवेश न मिळाल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा डोळस यांनी दिला आहे.