- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरातील गुन्हेगारी नियंत्रित राखण्यासाठी व्यापक प्रणाली राबवण्याची ग्वाही नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली आहे. बुधवारी त्यांनी पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी गुन्हे आणि गुन्हेगारांचे ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम राबवण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.नवी मुंबईचे पंधरावे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासह सह आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी बुधवारी आपला पदभार स्वीकारला. यावेळी मावळते आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासोबत चर्चा करुन त्यांनी शहरातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. चर्चेअंती प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना त्यांनी नवी मुंबईत गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सीसीटीएनएस (गुन्हे आणि गुन्हेगारांचे ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) प्रणाली राबवण्याची इच्छा आयुक्त संजय कुमार यांनी व्यक्त केली. ई-गर्व्हर्नसच्या माध्यमातून देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये ही प्रणाली राबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याद्वारे राज्याच्या सीआयडीमध्ये कार्यरत असतानाही या प्रणालीवर भर दिलेला होता. या प्रणालीद्वारे गुन्हेगारांची संपूर्ण माहिती संगणकीकृत होवून प्रत्येक गुन्हेगाराच्या हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. शिवाय गुन्हेगाराचे नाव, छायाचित्र यासह त्याने केलेले गुन्हे व त्यांच्या फिंगर प्रिंट पोलिसांना डिजिटल स्वरुपात उपलब्ध होणार आहेत. त्याद्वारे आंतरराष्टÑीय टोळ्यांच्या गुन्ह्यांच्या माहितीची देवाणघेवाण पोलिसांनाही सोपी होणार आहे. गुन्हेगारी नियंत्रणासाठी ही प्रणाली प्रभावी असल्याने त्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले.सध्या सायबर गुन्हेगारीसह अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे घडणारी गुन्हेगारी वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्याचे पोलिसांपुढे आव्हान असून ते आव्हान स्वीकारूनच काम करणार असल्याचेही ते म्हणाले. त्याकरिता सर्व अधिकारी व कर्मचारी यांना ट्रेडिशनल प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून तपास करण्याऐवजी प्रत्यक्षात घटनास्थळावर जाणे, वेळेचे बंधन पाळणे याशिवाय पोलीस ठाण्याला भेटी देणे नवनियुक्त आयुक्तांना अपेक्षित आहे.सन ८९ च्या बॅचचे संजय कुमार यांनी राज्याच्या अनेक भागात काम केलेले आहे. त्यानुसार राज्यातल्या इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतली गुन्हेगारी कमी असल्याचेही ते म्हणाले. तर सीआयडीमध्ये कार्यरत असताना इथल्या संपूर्ण गुन्हेगारीची माहिती आपल्याला आहे. त्याचा उपयोग नवी मुंबईत तळागाळापर्यंत पोहचून काम करण्यासाठी होणार असल्याचेही ते म्हणाले.गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यातही सुसंवाद असणे गरजेचे असल्याने, त्यांच्यातली दरी कमी करण्याच्या अनुषंगानेही प्रयत्न केले जाणार आहेत.
गुन्हेगारी नियंत्रणासाठी सीसीटीएनएस राबवणार, नवनियुक्त पोलीस आयुक्तांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 4:48 AM