पनवेल : पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरण परिसरात लावलेले काही सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. रविवारी दिवसभर धरण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे दिवसभर सीसीटीव्ही कॅमेरेही बंद होते. सुट्टीच्या दिवशी अनेक जण धरण परिसरात फिरायला येतात. तर काही जण धरणातील पाण्यात मासेमारीही करतात. मात्र या ठिकाणचे सीसीटीव्ही बंद असल्याने येणाºया-जाणाऱ्यांवर वॉच ठेवता येत नाही. परिणामी धरणाच्या सुरक्षेला बाधा पोहोचत आहे.देहरंग धरणात मार्च महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. सीसीटीव्ही बंद असल्याने समाजकंटकांनी अनुचित प्रकार केल्यास शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. सध्याच्या घडीला महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरक्षारक्षकदेखील तैनात करण्यात आलेले आहेत. मात्र धरण परिसर मोठा असल्याने, तसेच या ठिकाणी येण्यास अनेक वाटा असल्याने काही जण या ठिकाणी मासेमारीसाठी येतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्हींची गरज आहे.>देहरंग धरण परिसरातील सहापैकी तीन कॅमेरे बंद आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाºयांना कळविण्यात आले असून लवकरात लवकरच त्यांची दुरुस्ती केली जाईल.- रामदास तायडे,पाणीपुरवठा अधिकारी
देहरंग धरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 12:36 AM