खारफुटी संरक्षणासाठीचे सीसीटीव्ही कॅमेरे कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 12:59 PM2022-06-05T12:59:08+5:302022-06-05T13:00:16+5:30

Navi Mumbai : रविवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरात अनेक ठिकाणी हे कॅमेरे अद्यापही बसविले न गेल्याने भूमाफियांकडून खारफुटीची वारेमाप कत्तल सुरूच आहे.

CCTV cameras for protection of thorns only on paper | खारफुटी संरक्षणासाठीचे सीसीटीव्ही कॅमेरे कागदावरच

खारफुटी संरक्षणासाठीचे सीसीटीव्ही कॅमेरे कागदावरच

Next

- नारायण जाधव 

नवी मुंबई : महामुंबईतील खारफुटीची होणारी वारेमाप कत्तल रोखण्यासाठी वनविभागाने परिसरात २५० ठिकाणी सीसीटीव्ही  कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरात अनेक ठिकाणी हे कॅमेरे अद्यापही बसविले न गेल्याने भूमाफियांकडून खारफुटीची वारेमाप कत्तल सुरूच आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींत संताप व्यक्त होत आहे.

यासाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. मुंबई शहरात ७०, मुंबई उपनगरात ७०, ठाण्यामध्ये ४०, भिवंडीमध्ये ३०, नवी मुंबईत ४० अशा २५० ठिकाणी हे तीन प्रकारचे कॅमेरे बसविण्यात येणार होते.  सीसीटीव्हीमुळे खारफुटींवर होणारी आक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे थांबून पर्यावरणाचे रक्षण होईल,  असा विश्वास त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला होता. मात्र, अद्यापही हे कॅमेरे बसविले न गेल्याने नाराजी  व्यक्त होत आहे.

काेविड काळात खारफुटीवर अतिक्रमण
कोविडच्या लॉकडाऊन काळात अनेक ठिकाणी खारफुटी झाडांची कत्तल करण्यात आली होती. ठाण्यातील  मुंब्रा आणि दिवा शहराला जोडणारा मुंब्रा चुहा पूल ते दिवा येथील साबेगावपर्यंत दोन किलोमीटर लांबीचा रस्ता खारफुटी कापून भूमाफियांनी तयार केल्याचा गंभीर प्रकारही समोर आला होता, तर नवी मुंबईत एनआरआय कॉम्प्लेक्ससह जेएनपीटी, उरण, खारघर परिसरात वेटलँड अर्थात अनेक पाणथळीच्या जागांवर भराव टाकून  अतिक्रमणे केल्याचे उघडकीस आले आहे.

१८ हजार खारफुटीवर वॉच ठेवणार कसा
भारतीय वनसर्वेक्षणानुसार मुंबईत सध्या ६,६०० हेक्टर कांदळवनक्षेत्र आहे. त्यापैकी २७६ हेक्टर हे मुंबई शहरात असून, उपनगरामध्ये ३,९४८.४ हेक्टर राखीव वन म्हणून अधिसूचित केले आहे. यातील ३,७०६.४ हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात आहे. उर्वरित २४२ हेक्टर क्षेत्र एमएमआरडीए, एमआयडीसी, म्हाडा यांच्या मालकीचे आहे. वन विभागाच्या माहितीनुसार सिंधदुर्ग, रायगड, ठाणे आणि अंधेरी, बोरीवलीत १,३८६ हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. याशिवाय नुकतेच रायगड, ठाणे जिल्ह्यांतील १०२२ हेक्टर खारफुटी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेऊन बरेच दिवस झाले. मात्र, त्यांची निविदा प्रक्रियाही अद्याप सुरू  केलेली नाही. हा निर्णय चांगला असला तरी जे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, ते हायरिझॉल्यूशनचे हवेत. शिवाय त्यासाठी अद्ययावत कंट्रोल रूम हवी. सध्या पुनर्विकासातून जे डेब्रिज बाहेर पडत आहे, ते भूमाफिया खारफुटीवर टाकून अतिक्रमण करून घरे, गोदामे बांधत आहेत. यावरही नियंत्रण हवे.
- बी. एन. कुमार, संचालक नॅटकनेक्ट फाउंडेशन

खारफुटी संवर्धन आणि संरक्षणासाठी जे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, त्यासाठी वनविभागाने  प्रकल्प व्यवस्थापकाची नेमणूक करून त्यासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांच्याकडून आलेल्या तांत्रिक अहवालानुसार निविदा मागवून उच्चप्रतीचे कॅमेरे नेमून दिलेल्या ठिकाणी  बसविण्यात येतील. 
  - आदर्श रेड्डी, विभागीय वन अधिकारी, कांदळवन, संधारण घटक, मुंबई

Web Title: CCTV cameras for protection of thorns only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.