मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार पश्चिम रेल्वेमार्गावरील एका लोकलच्या एका महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, २९ मेपासून हे सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात येणार आहेत. हे सीसीटीव्ही प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर हल्ले होत असून, त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे पाहता महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. सीसीटीव्ही बसविण्यात आल्यानंतर त्याची मुंबई सेंट्रल ते अंधेरी अशी यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर २९ मेपासून या लोकलच्या महिला डब्यातील सीसीटीव्ही प्रत्यक्षात कार्यान्वित करीत असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले. हे सीसीटीव्ही प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात येत असून, ही योजना यशस्वी झाल्यावर सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यात येणार आहे. साधारणपणे प्रत्येक महिला डब्यात ४ ते ८ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत, असे चंद्रायन म्हणाले. २९ मे रोजी रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांच्या हस्ते सीसीटीव्ही योजनेचा शुभारंभ केला जाईल. (प्रतिनिधी)यात डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर असून, ३0 दिवसांपर्यंतच्या चित्रीकरणाचा साठा करू शकतो. हे कॅमेरे ३ मेगापिक्सल एवढे असून, संपूर्ण डब्यातील चित्रीकरण याद्वारे होईल.
महिला डब्यातील सीसीटीव्ही कॅमरे कार्यान्वित होणार
By admin | Published: May 29, 2015 1:29 AM