नेरळ : कर्जत-कल्याण आणि नेरळ-माथेरान या दोन प्रमुख रस्त्यांवर लक्ष ठेवण्याची महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी नेरळ पोलिसांनी हुतात्मा चौकात तिसरा डोळा बसविला आहे. अत्यंत बारीक बाबींवर लक्ष ठेवण्याची क्षमता असलेला या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे कॅमेरे थेट नेरळ पोलीस ठाण्याशी जोडले असून, त्यासाठी कोणतीही केबलवाहिनी जोडण्यात आली नाही. कोणत्याही वीजप्रवाहाशिवाय हा तिसरा डोळा परिसरावर लक्ष ठेवण्याचे काम करणार असून, तो सौरऊर्जेवर चालणार आहे. हुतात्मा चौकात स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठीही आणखी एक कॅमेरा बसविण्यात आला आहे.नेरळ गावातील महत्त्वाच्या अशा हुतात्मा चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या चौकातून माथेरान या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेला एकमेव रस्ता आहे. तर कर्जत आणि कल्याण या ठिकाणी जाणारा राज्य महामार्ग याच हुतात्मा चौकातून जातो. त्यामुळे अनुचित प्रकार करणाऱ्यांच्या कारवाया रोखण्यासाठीही हे महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे. या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून चौकअधिक सुरक्षित करावा, अशी मागणी अनेकदा नेरळ ग्रामपंचायत आणि नेरळ पोलीस ठाणे यांच्याकडे करण्यात आली होती. अखेर त्याबाबत नेरळ पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उललेले असून, हुतात्मा चौकात असलेल्या स्वागतकमानीला हा अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला आहे. त्या कॅमऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, हा कॅमेरा सौरऊर्जेवर चालणार आहे. त्याला कोणत्याही प्रकारची वीज देण्याची गरज नाही. दुसरीकडे या कॅमेऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कॅमेऱ्याची दिशा जरी एका बाजूला दिसत असली तरी त्या कॅमेऱ्याचे लक्ष हे सर्व परिसरावर असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या भागातील सर्व हालचाली पोलीस यंत्रणेला लगेच समजाव्या म्हणून थेट नेरळ पोलीस ठाण्यातील नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आला आहे. वाहतूककोंडी फोडण्यासाठीही या तिसऱ्या डोळ्याचा नेरळ पोलिसांना मोठा फायदा होऊ शकतो.तर दुसरा कॅमेरा संपूर्ण हुतात्मा स्मारकावर लक्ष ठेवणार आहे. (वार्ताहर)
नेरळच्या हुतात्मा चौकात सीसीटीव्ही
By admin | Published: January 12, 2017 6:05 AM