अत्याधुनिक यंत्रणांसह सीसीटीव्हीचे जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:37 PM2019-01-12T23:37:15+5:302019-01-12T23:37:35+5:30
महापालिकेत नियंत्रण कक्ष : शहरात १२०० कॅमेरे बसविण्याची योजना; १५० कोटींचा प्रकल्प
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : २१ व्या शतकातील अत्याधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांची आणि शहराची सुरक्षितता करण्याच्या अनुषंगाने शहराला साजेसा उपक्र म राबविण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी पॅनिक अलार्म व कॉल बॉक्सची सुविधा ही अत्याधुनिक यंत्रणा बसविण्याबरोबर सुमारे १२०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेºयांचा वॉच ठेवण्यात येणार आहे. या सुविधेचा महापालिकेत कक्ष स्थापन करण्यात येणार असून, त्याचे कनेक्शन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला देण्यात येणार आहे. या बाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून बनविण्यात आला असून लवकरच तो महासभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
नवी मुंबई शहरातील नागरिक आणि शहराची सुरक्षा करण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून २०१२ साली शहराचे प्रवेशद्वार, मुख्य चौक, मार्केट, बस डेपो, रेल्वे स्थानकांबाहेरील परिसर, जास्त वर्दळ असलेली ठिकाणे आदी ठिकाणी सुमारे २८२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सदर यंत्रणेचा कालावधी पाच वर्षांहून अधिक झाल्याने सदर यंत्रणा कालबाह्य झाली आहे. शहरातील मुख्य व जास्त वर्दळीच्या ठिकाणी देखरेखीकरिता सीसीटीव्ही महत्त्वाचे असून, शहरात ये-जा करणाºया वाहनांची माहिती ठेवण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक प्रणाली असलेले सीसीटीव्ही बसविण्याच्या विचारात प्रशासन आहे. यासाठी शहरातील ऐरोली-मुलुंड उड्डाणपूल, ठाणे-दिघा रोड, शिळफाटा जंक्शन, वाशी टोलनाका, किल्ले गावठाण, बेलपाडा अशा सर्व इंट्री पॉइंट्सच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रवेश आणि निर्गमन जागेवर हाय डेफिनेशन फिक्स व हाय स्पीड कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. शहरात येणाºया वाहनांच्या माहितीकरिता स्वयंचलित क्र मांक प्लेट स्वयंचलितपणे वाचण्यासाठी सुमारे ५४ पीएनआर कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
शहरातील २७ मुख्य चौकांमध्ये हाय डेफिनेशन व हाय स्पीड असे १०८ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मार्केट, बस डेपो, रेल्वे स्थानकांबाहेरील परिसर, उद्यान, मैदाने, महापालिका कार्यालये, चौक, नाके, जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणीही पीटीझेड कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पामबीच रोड, ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल महामार्ग आणि मुख्य चौक आदी ठिकाणी ८० स्पीडिंग कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स या इलेक्ट्रिक डिव्हाइसच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत व्यक्तींना आणि मालमत्तेस धोका असल्यास सावध करण्यासाठी त्याचा वापर केला जाणार असून, शहरातील नागरिकांच्या आणि मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात ही सुविधादेखील राबविली जाणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने बसविण्यात येणाºया कॅमेºयांचे महापालिकेच्या आठ कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून, महापालिका मुख्यालयात महत्त्वाचे कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत व त्याची लिंक नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला जोडण्यात येणार आहे. या कामाचे डेटा सेंटरदेखील पोलीस आयुक्तालयात स्थापन करण्यात येणार आहे. या बाबतचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, महासभेच्या पटलावर घेण्यासाठी पाठविला आहे.
खाडी, समुद्रभागात थर्मल कॅमेरे
नवी मुंबई शहराला मोठा खाडीकिनारा लाभला असून, घातपात विरोधी व देश विघातक कृत्यावर नजर ठेवण्यासाठी तसेच शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने खाडी, समुद्र अशा ठिकाणी थर्मल कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेली सीसीटीव्ही कॅमेºयांची गरज आणि या यंत्रणेची क्षमता याचा सर्व अभ्यास करून, १२०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहे. सीसीटीव्ही आणि इतर सुरक्षा यंत्रणासाठी अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदीनुसार सुमारे १५० कोटींचा सदरचा प्रस्ताव मांडण्यात येत असून, यासाठी महासभेची मंजुरी महत्त्वाची आहे.
- डॉ. रामास्वामी एन.,
पालिका आयुक्त