खारफुटीवर सीसीटीव्हीचा वॉच

By admin | Published: November 10, 2015 01:20 AM2015-11-10T01:20:01+5:302015-11-10T01:20:01+5:30

खारफुटीची नासाडी करणाऱ्या प्रवृत्तींवर वॉच ठेवण्यासाठी कांदळवनांवर सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश कोकण विभागीय महसूल आयुक्त तानाजी सत्रे यांनी महापालिकेला दिले आहेत.

CCTV watch on mangroves | खारफुटीवर सीसीटीव्हीचा वॉच

खारफुटीवर सीसीटीव्हीचा वॉच

Next

नवी मुंबई : खारफुटीची नासाडी करणाऱ्या प्रवृत्तींवर वॉच ठेवण्यासाठी कांदळवनांवर सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश कोकण विभागीय महसूल आयुक्त तानाजी सत्रे यांनी महापालिकेला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या कांदळवन संरक्षण समितीची बैठक सोमवारी कोकणभवन येथे पार पडली. या बैठकीत सत्रे यांनी या सूचना केल्या आहेत.
या बैठकीस पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, उपायुक्त (महसूल ) भाऊसाहेब दांगडे, सिडकोच्या पर्यावरण व वने विभागाचे महाव्यवस्थापक जी. के. अनारसे, विभागीय वन अधिकारी कांदळवन संधारण घटक संजय माळी, नवी मुंबई एन्वारमेंट प्रिझर्वेशन सोसायटीचे प्रतिनिधी अनुपम वर्मा, सिडकोचे मुख्य नियोजक एम. डी. लेले, वनाधिकारी सीमा आडगांवकर आदी उपस्थित होते. सत्रे यांनी उपस्थित समिती सदस्यांना मार्गदर्शन केले. सिडको, महानगरपालिका, वन विभाग व पोलीस यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याची जबाबदारी या समितीची राहील, असे सत्रे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक महिन्याला कांदळवन संरक्षण संनियंत्रण समितीची आढावा बैठक घेण्याचेही सूचित केले.
महानगरपालिका व सिडको यांच्याकडील घनकचरा संबंधीच्या नागरिकांच्या तक्रारी समितीच्या बैठकीत सादर कराव्यात. त्या तक्रारीवर करण्यात आलेल्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल या बैठकीत ठेवण्यात यावा. घनकचरा नियंत्रणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेत दोन पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच महानगरपालिका व सिडको यांच्याकडे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी डेब्रिज टाकून कांदळवन नष्ट केले आहे, तेथील डेब्रिज काढून पुन्हा कांदळवनाची लागवड करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. तसेच महापालिका क्षेत्रात दोन मोठे कांदळवन आहेत. या दोन ठिकाणी महापालिकेने सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. परंतु त्यानंतरही खारफुटीची नासाडी सुरूच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत, अशा सूचना सत्रे यांनी यावेळी महापालिकेला केल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: CCTV watch on mangroves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.