तळोजातील २९६८ कैद्यांवर आता सीसीटीव्हींचा वॉच; ४५१ कॅमेऱ्यांचा शुभारंभ
By नारायण जाधव | Published: July 15, 2024 07:32 PM2024-07-15T19:32:25+5:302024-07-15T19:32:43+5:30
४५१ कॅमेऱ्यांचा अमिताभ गुप्ता यांनी केला शुभारंभ
नवी मुंबई: दहा नक्षलवाद्यांसह मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसह २९६८ जण कैदेत असणाऱ्या तळोजा मध्यवर्ती कारागृहावर आता ४५१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ‘वॉच’ राहणार आहे. या सीसीटीव्ही प्रणालीसह नियंत्रण कक्षाचे उद्घाटन सोमवारी राज्याचे कारागृह व सुधारसेवा विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले.
यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, उपअधीक्षक महादेव पवार, जितेंद्र काळे, तुरुंग अधिकारी राहुल झुटाळे व कर्मचारी उपस्थित होते. सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात नक्षलवादी टोळीतील १० तर १९९३ बॉम्बस्फोटातील एक अशा गंभीर गुन्ह्यातील अनेक कैद्यांचा मुक्काम आहे.
२००८ साली खारघरनजीक २७ हेक्टर क्षेत्रावर तळोजा कारागृह सुरू झाले. येथे कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी १८० कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तळोजा कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून, त्यांच्या सुरक्षिततेबाबत अनेकदा पोलिस आणि कैद्यांतील वाद न्यायालयात मांडले जातात. यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रिकरण महत्त्वाचे असल्याने ही सुविधा उपलब्ध केली असल्याचे यावेळी अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.