नवी मुंबई : मागील ४० वर्षांत सिडकोने बांधलेल्या वाणिज्यिक आणि व्यावसायिक मालमत्तांचा संपूर्ण तपशील सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. यात सिडकोनिर्मित सदनिका, दुकाने, कार्यालयीन गाळ्यांचा समावेश आहे. मालमत्ताधारकांनी या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या मालमत्तांच्या तपशिलाची शहानिशा करावी. काही तफावत आढळून आल्यास त्यात सुधारणा केल्या जातील, असे सिडकोकडून स्पष्ट केले आहे.स्थापनेपासून सिडकोने नवी मुंबईच्या १३ नोडमध्ये जवळपास १३५००० मालमत्तांचा विकास केला आहे. यात वाणिज्य आणि निवासी मालमत्तांचा समावेश आहे. या सर्व मालमत्तांचा तपशील संकलित करण्यासाठी एका खासगी संस्थेकडून फेब्रुवारी २०१७ ते १५ मे २०१८ या कालावधीत सर्व्हेक्षण करण्यात आले होते. उपलब्ध माहितीचा तपशील सिडकोच्या वसाहत विभागातील दस्तावेजांशी जुळवून अवलोकन आणि सुधारणांसाठी तो संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. मालमत्तांच्या तपशिलात तफावत आढळून आल्यास त्यासंदर्भात सांख्यिकी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान, या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून विक्री न झालेल्या आणि वापराविना पडून असलेल्या मालमत्तांची विक्री करण्याची सिडकोची योजना आहे. त्यासाठी लवकरच योजना जाहीर करण्यात येणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यशसिडकोने आपल्या मालमत्ता ज्या प्रयोजनासाठी दिल्या आहेत, त्यासाठीच वापर होतोय का? सिडकोने बांधलेल्या सर्वच मालमत्तांची विक्री झाली आहे का? विक्रीविना पडून असलेल्या मालमत्तांचे काय झाले? आदी विषयांवर १७ जानेवारी २०१७ मध्ये ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सिडको निर्मित सर्व मालमत्तांचे सर्व्हेक्षण करून तपशील संकलित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार फेब्रुवारी २०१७ मध्ये मे. ध्रुव कन्सल्टन्सी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. या कंपनीने १५ फेब्रुवारी २०१७ ते १५ मे २०१८ या १५ महिन्यांच्या कालावधीत शहरात सर्व्हेक्षण करून हा तपशील गोळा केला आहे.
सिडकोनिर्मित मालमत्ता संकेतस्थळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:44 AM