जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 01:03 AM2021-03-09T01:03:28+5:302021-03-09T01:04:15+5:30

नवी मुंबईत महिला पोलिसांतर्फे मोटारसायकल रॅली : वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश

Celebrate World Women's Day with enthusiasm | जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी मुंबई : महिला दिनाचे औचित्य साधून पोलिसांतर्फे मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सीबीडी येथील पोलीस मुख्यालयातून सुरू झालेल्या रॅलीची सांगता वाशीत करण्यात आली. याप्रसंगी महिला पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला. 
महिला दिनाचे औचित्य साधून विशेष शाखेच्यावतीने हा  उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये महिला अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच कर्मचाऱ्यांना या रॅलीमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. त्यानुसार पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी सहआयुक्त डॉ. जय जाधव, अपर आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, उपायुक्त रूपाली अंबुरे, आदी उपस्थित होते. या रॅलीची सांगता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाली. फलकाच्या माध्यमातून महिला पोलिसांनी वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला. 

सोशल मीडियावर महिला दिन साजरा
नवी मुंबई : सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी भाषणबाजी न करता तळागाळातील कचरा वेचक महिला तसेच निराधार महिलांसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वृषाली मगदूम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा महिलांसाठी सोमवारी कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन ‘आव्हानांची निवड’ या घोषवाक्याच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधून मार्गदर्शन केले. वृषाली मगदूम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला दिन कष्टकरी, शेतकरी, कामगार, कचरा वेचक, घरकाम करणाऱ्या महिलांपर्यंत पोहोचेल, त्यांना समता, समानता, आर्थिक स्थितीत‌ सुधार, निर्णयस्वातंत्र्य मिळावे, दारिद्र्य व‌ कौटुंबिक हिंसाचारातून सुटका व्हावी, हाताला काम व योग्य मोबदला मिळावा हीच महिला दिनानिमित्त मगदूम यांनी इच्छा व्यक्त केली.

पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क 
पनवेल : पनवेल महानगरपालिका, तहसील कार्यालय आदींसह सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध  कार्यक्रम आयोजित करून महिलांप्रति संवेदना व्यक्त करण्यात आल्या. 

पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून पनवेलमध्ये महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्र उभारण्यात आले होते. तसेच पालिकेच्या वतीने महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून तज्ज्ञ महिलांचे ऑनलाइन मार्गदर्शन शिबिर पार पडले. खारघर शहरातील मदरहुड हॉस्पिटलच्या वतीने महिला पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ सुरभी सिद्धार्थ यांनी महिला पोलिसांची तपासणी केली. कामाचे ठरावीक वेळापत्रक नसल्याने महिलांमध्ये विविध आजार जडण्याची  संभावना असल्याचे यावेळी तपासणीत निष्पन्न झाले. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासह  जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला यावेळी डॉ सिद्धार्थ यांनी दिला. जेणेकरून महिला पोलिसांना भेडसावणारे मूत्रविकाराच्या आजारांवर नियंत्रण मिळविता येईल. ब्लू डार्ट या कंपनीच्या माध्यमातून भारतातील संपूर्ण महिलांनी संचलित असे केंद्र खारघर शहरात सुरू केले आहे. या केंद्रात सर्व महिला ब्लू डार्ट कंपनीचे व्यावसायिक काम पाहणार आहेत. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल मीडिया प्रेस क्लबच्या माध्यमातून माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर ७० महिलांना सन्मानित करण्यात आले. तहसील  कार्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला.
 

Web Title: Celebrate World Women's Day with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.