नवी मुंबई - स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापनदिनानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण होते. ठिकठिकाणी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण भवन कार्यालयात राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर शहराचे महापौर जयवंत सुतार यांनी महापालिकेच्या बेलापूर येथील मुख्यालयात ध्वजारोहण करून मानवंदना दिली.स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये, खासगी गृहनिर्माण संस्था आदी ठिकाणी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. तर काही भागात सकाळी प्रभात फेरी व सायकल रॅली काढण्यात आली. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तर सीबीडी येथील पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी ध्वजारोहण केले. नेरुळ येथील कोकण रेल विहारात कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शेतकरी शिक्षण संस्थेच्या घणसोली येथील शाळेत नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य रमेश पाटील यांनी ध्वजारोहण करून मानवंदना दिली. महापालिकेच्या माध्यमातून या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या कोपरखैरणे येथील सीबीएसई हायस्कूलमध्ये आमदार संदीप नाईक यांनी झेडांवदन केले. महापालिकेच्या विविध शाळांत सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक आणि थर्माकोलमुक्त नवी मुंबईचा संदेश देण्यात आला. हा संदेश शहरातील घराघरात पोहोचविण्याचे आवाहन महापौर जयवंत सुतार यांनी केली. या वेळी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. ऐरोली येथे भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच त्यानंतर शहरात युवकांची तिरंगा रॅली काढण्यात आली.पनवेलमध्ये ध्वजारोहणपनवेल महापालिका तसेच खासगी शाळांसह पालिका मुख्यालय, पोलीस मुख्यालय, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालयात या वेळी ध्वजारोहणाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात आला.
नवी मुंबईत स्वातंत्र्यदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 2:37 AM