कळंबोलीत सिडकोने बांधलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:10 PM2019-08-28T23:10:24+5:302019-08-28T23:10:34+5:30

सुविधांचा अभाव : फक्त दोनच शवदाहिनींचा वापर : नागरिकांनी व्यक्त केली नाराजी

cemetery built by CIDCO in Kalamboli in worst condition | कळंबोलीत सिडकोने बांधलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था

कळंबोलीत सिडकोने बांधलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था

Next

कळंबोली : कळंबोली वसाहतीकरिता सिडकोने बांधलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी चारपैकी दोनच शवदाहिन्या सुरू आहेत. तसेच इतर सुविधांचीही वानवा आहे. त्याच अवस्थेत सिडकोकडून महापालिकेने स्मशानभूमी अंतर्गत सेवा वर्ग करून घेतल्या आहेत. तर सिडकोने १0 कोटी विविध कामासाठी मंजुरी दिली असली तरी त्यात स्मशानभूमी वगळण्यात आली असल्याने नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.


रोडपाली तलावाजवळ सिडकोने सुरुवातीला स्मशानभूमी उभारली आहे. त्या ठिकाणी शोकसभा, प्रार्थना तसेच विधी करण्याकरिता निवारा बांधण्यात आला होता. त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता या ठिकाणचा स्लॅब कधी कोसळेल याची शाश्वती देता येत नाही. त्याला लोखंडी खांबांचा टेकू देण्यात आला आहे. त्याचबरोबर भिंतीला मोठमोठे तडे सुद्धा गेले आहेत. त्यामुळे ही वास्तू धोकादायक असल्याची स्थिती आहे. त्याचबरोबर स्मशानभूमीत चार शवदाहिन्या आहेत त्यापैकी दोनच चालू आहेत. त्यांची अवस्था फार चांगली नाही. उर्वरित दोनची दुरवस्था झाली आहे. त्या कार्यान्वित करण्याबाबत सिडकोकडून कधीच प्रयत्न झाले नाहीत. मात्र, जेव्हा एकाच वेळी जास्त मृतदेह येतात त्यावेळी दगडांचा टेकू देऊन बंद असलेल्या शवदाहिन्यांमध्ये अंत्यसंस्कार करावे लागतात. या ठिकाणी पाणी साठवणूक करण्याकरिता जास्त क्षमतेचे जलकुंभ नाही त्यामुळे पाणीटंचाईलासुद्धा सामोरे जावे लागते. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना बसण्यासाठी जो निवारा आहे त्याचीही दुरवस्था झालेली आहे. पावसाळ्यात तर त्याला गळती लागते, त्यामुळे स्मशानात काम करणाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. स्मशानभूमीत गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या आठवड्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी केली.


नूतनीकरणाचा प्रस्ताव रेंगाळला
कळंबोली स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार होता. याकरिता निधीसुद्धा मंजूर झाला होता. त्याचबरोबर मे महिन्यात सिडकोने विविध कामाकरिता १0 कोटी मंजुरी दिली आहे; परंतु त्यात स्मशानभूमी वगळण्यात आली आहे.
महापालिका स्थापन झाल्यानंतर सिडकोने आखडता हात घेतला असल्याचे मत येथील रहिवासी आत्माराम कदम यांनी व्यक्त केले. खारघरला विद्युत शवदाहिनी असताना कळंबोलीला का नाही, असा सवालसुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे.

स्मशानभूमीत लाकडेच नाहीत
सिडकोने या ठिकाणची देखभाल करणे, तसेच लाकडे पुरविण्याकरिता एका एजन्सीची नियुक्ती केली होती. प्रतिकिलो सात रुपये दराने ठेकेदार अंत्यविधीकरिता लाकडे उपलब्ध करून देत होता; पण महापालिकेकडे स्मशानभूमीमधील सेवा दिल्यामुळे या ठिकाणी ठेकेदार नेमला नाही, त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत.
 

स्मशानभूमी हस्तांतरित झाली नसली तरी आतमधील सेवा महापालिका पुरवते. त्यांचे कामगार तिथे काम करीत आहेत. लाकडे पुरविण्याकरिता मनपानेच ठेकेदार नेमणे क्र मप्राप्त आहे, तसेच विविध कामासाठी सिडकोने १0 कोटी मंजुरी दिली असली तरी त्यात स्मशानभूमीचे काम करण्यात येणार नसून त्यासाठी वेगळ्या बजेटची मागणी करण्यात आली आहे.
- गिरीश रघुवंशी, कार्यकारी अभियंता, सिडको, कळंबोली
 

Web Title: cemetery built by CIDCO in Kalamboli in worst condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.