घणसोलीतील हत्येच्या घटनांमुळे नागरिक भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:52 AM2019-06-08T00:52:54+5:302019-06-08T00:53:02+5:30

तीन महिन्यांत दोन घटना : महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला

Censors are afraid of Ghansoli killings | घणसोलीतील हत्येच्या घटनांमुळे नागरिक भयभीत

घणसोलीतील हत्येच्या घटनांमुळे नागरिक भयभीत

Next

नवी मुंबई : घणसोली येथील वापरात नसलेल्या पाण्याच्या टाकीत अज्ञात महिलेचे धड आढळून आले आहे. तीन महिन्यांपूर्वी याच घटनास्थळापासून काही अंतरावर महिलेचे अर्धवट जळालेले शिर आढळले होते. त्यामुळे हे दोन्ही अवयव एकाच महिलेचे असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या गुन्ह्याच्या अनुषंगाने अद्यापपर्यंत कसलाही ठोस पुरावा हाती लागलेला नसल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.

घणसोली परिसरातील आडोशाच्या जागा गुन्हेगारांच्या सोयीच्या ठरू लागल्या आहेत. परिसरात अनेक भूखंड मोकळे असून त्यावर दाट झाडी वाढली आहे, तर वापरात नसलेल्या वास्तूंच्या ठिकाणीही कोणतीही सुरक्षा नसल्याने तिथेही गुन्हेगारी कृत्यांना थारा मिळू लागला आहे. ३ जून रोजी घणसोली सेक्टर ८ येथील वापरात नसलेल्या सुमारे २५ मीटर उंचीच्या पाण्याच्या टाकीत महिलेचा मृतदेह आढळून आला. एका व्यक्तीने याबाबत पोलिसांना कळवले असता, पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह टाकीतून काढला. छिन्नविछिन्न अवस्थेतील महिलेचे धड असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सदर धड पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने एक ते दीड महिन्यांपूर्वी याठिकाणी टाकण्यात आले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याच घटनास्थळापासून एक किलोमीटरच्या अंतरातच २६ मार्चला एका महिलेचे शिर आढळून आले होते. मोकळ्या भूखंडावरील झाडीमध्ये हे शिर जाळण्याचा प्रयत्न झालेला होता. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोध घेऊनही धड सापडले नव्हते. अशातच तीन महिन्यांनी पाण्याच्या टाकीत मिळालेले धड व यापूर्वी सापडलेले शिर एकाच महिलेचे असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, दोन्ही अवयवयांचा डीएनए अहवाल आल्यानंतर त्याचा उलगडा होऊन तपासाला दिशा मिळेल, असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले.

दरम्यान, धड व शिर सापडण्याच्या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी पॅराशूटमधून विदेशी महिला उतरल्याचा प्रकार देखील घणसोली पामबीच मार्गावर घडला होता. याशिवाय सोनसाखळी चोरीसह इतरही अनेक प्रकारचे गुन्हे घणसोली परिसरातील एकांताच्या ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे रहिवाशांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश चव्हाण यांनी केली आहे.

पामबीच मार्गावर सीसीटीव्हीची मागणी
काही महिन्यांपूर्वी पॅराशूटमधून विदेशी महिला उतरल्याचा प्रकार देखील घणसोली पामबीच मार्गावर घडला होता. त्यामुळे रहिवाशांमध्ये दहशत पसरवणाऱ्या घटना घणसोली परिसरात घडू लागल्याची चिंताही व्यक्त होत आहे.

घणसोली परिसरात तसेच पामबीच मार्गावर सीसीटीव्ही बसवण्याची मागणी सातत्याने होत आहे. दिवंगत माजी नगरसेवक संजय पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रकार देखील घणसोली पामबीच मार्गावरील रात्रीच्या काळोखात झाला होता.

Web Title: Censors are afraid of Ghansoli killings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.