नवी मुंबई - देशभरातील ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा सुरूच ठेवला जाईल. ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, असे मत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. ते नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित ओबीसी कृतज्ञता मेळाव्यात बोलत होते.
देशात मंडल आयोगाची अंमलबजावणी सर्वप्रथम शरद पवार यांनी केली. त्यांनी नेहमी लढ्याला पाठिंबा दिला. देशाचे राजकारण ताब्यात घेण्याची ताकद ओबीसींमध्ये आहे. मनुवादी प्रवृत्तीचे लोक अडथळे आणत आहेत. सरकारी उद्योग बंद पाडले जात आहे. रोजगाराच्या संधी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वांनी मिळून समाजाच्या हितासाठी लढत राहू, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.
राज्यातील तरूणांना यूपी, बिहारच्या तरूणांप्रमाणे नोकरीसाठी इतर राज्यात भटकावे लागेल -या सरकारमुळे महाराष्ट्रातील तरूणांना उत्तर प्रदेश बिहारच्या तरूणांप्रमाणे नोकरीसाठी इतर राज्यात भटकावे लागेल. वेदांता व इतर प्रकल्प इतर राज्यात जात आहेत. यामुळे रोजगारावर परिणाम होत आहे. भविष्यात महाराष्ट्रातील तरूणांना रोजगारासाठी इतर ठिकाणी जावे लागेल, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी भाजप सरकारवर टिका केली.