प्रांतिक संघटनांसह सामाजिक संस्थांवर लक्ष केंद्रित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:20 AM2019-04-17T00:20:28+5:302019-04-17T00:20:33+5:30

ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नवी मुंबईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Centers focused on social organizations with provincial organizations | प्रांतिक संघटनांसह सामाजिक संस्थांवर लक्ष केंद्रित

प्रांतिक संघटनांसह सामाजिक संस्थांवर लक्ष केंद्रित

Next

नामदेव मोरे 

नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नवी मुंबईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शहरामधील आठ लाख २५ हजार मतांवर शिवसेनेसह राष्ट्रवादीने लक्ष केंद्रित केले आहे. जास्तीत जास्त मते पारड्यामध्ये पाडून घेण्यासाठी प्रांतनिहाय संघटना, सामाजिक संस्था यांच्याही बैठका घेतल्या जात आहेत.
राज्यातील सर्वाधिक २३ लाखांपेक्षा जास्त मतदार ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. प्रमुख लढत शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये असून, दोन्ही उमेदवार ठाणे शहरामधील आहेत, यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईमध्ये प्रचाराविषयी अनुत्साहाचे वातावरण होते. प्रचारामधील मरगळ झटकून टाकण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे व राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी शहरात रॅली काढून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघांमध्ये एकूण आठ लाख २५ हजार १६६ मतदार आहेत. नवी मुंबईमधून कोणाला मताधिक्य मिळणार यावर निकाल अवलंबून असणार आहे. यामुळे येथून जास्तीत जास्त मते मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून त्यासाठी सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग राबविला जात आहे. देशाच्या व राज्यातील कानाकोपऱ्यामधून नागरिक येथे राहण्यासाठी आले आहेत. केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व इतर राज्यांची भवन व सामाजिक संघटना शहरामध्ये कार्यरत असून, सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, कोकणामधील नागरिकांच्या संघटनाही अस्तित्वात आहेत. निवडणुकांमुळे सामाजिक संस्था व प्रांतनिहाय संघटनांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादी व काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी वाशीमध्ये केरळ समाजामधील काही नागरिकांची बैठक घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. शिवसेना पदाधिकाºयांनी माथाडी भवनमध्ये मुस्लीम समाजामधील नागरिकांशी संवाद साधला. प्रत्येक प्रांत व समाजाची एकगठ्ठा मते मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी विविध समाजाच्या पदाधिकाºयांच्या व नागरिकांच्या बैठका आयोजित केल्या जात आहेत. नवी मुंबईमध्ये वास्तव्यास आलेल्या विविध समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठीचे आश्वासन दिले जात आहे. समाजासाठी भवन उभारण्यापासून ते विविध प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी माथाडी कामगारांपासून विविध संघटनांच्या बैठकांचेही आयोजन करण्यात आले होते. संस्था व संघटनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक संघटनांनी कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यापेक्षा सर्वांचे स्वागत करून सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही एका पक्षाचे समर्थन करत असल्याचा ठपका बसू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
>प्रत्येक पक्षाचे सेल सक्रिय
नवी मुंबईमध्ये या पूर्वीच्या निवडणुकांमध्येही प्रांतिक व सामाजिक संघटनांना महत्त्व देण्यात आले होते. सर्वच राजकीय पक्षांकडे कोणत्या राज्यातील किती नागरिक नवी मुंबईमध्ये वास्तव्यासाठी आहेत. मतदार यादीचाही अभ्यास करून त्याप्रमाणे वर्गीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक समाजाची एकगठ्ठा मतांसाठी शिवसेनेसह राष्ट्रवादीनेही सेल तयार केले आहेत. शिवसेनेने नुकतेच उत्तर भारतीय समाजातील पदाधिकाºयांसाठी प्रशिक्षण शिबिराचेही आयोजित केले होते.
>मतदारांचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न
नवी मुंबईमध्ये राहणाºया अनेक नागरिकांची त्यांच्या गावाकडील मतदारसंघामध्येही मतदारयादीमध्ये नावे आहेत. विविध राज्यांमधील नागरिकांचेही त्यांच्या मूळगावाकडेही मतदारयादीमध्ये नाव आहे. ज्यांचे दोन ठिकाणी नाव नाही; परंतु गावाकडे राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे गावाकडील नेत्यांकडून प्रचारासाठी बोलावले जात आहे, यामुळे मतदारांचे व कार्यकर्त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
>मताधिक्यासाठी रस्सीखेच
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ८ लाख २५ हजार मतदार आहेत. ऐरोली मतदारसंघात ४ लाख ४८ हजार ६८१ मतदार, बेलापूर मतदारसंघात ३ लाख ७६ हजार ४८५ मतदार आहेत. गत निवडणुकीमध्ये दोन्ही मतदारसंघांमधून शिवसेनेला मताधिक्य मिळाले होते. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये मिळालेले मताधिक्य टिकविण्याचे आव्हान या वेळी शिवसेनेसमोर असणार आहे. ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यावर राष्ट्रवादीच्या उमेदवाराची जबाबदारी आहे.

Web Title: Centers focused on social organizations with provincial organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.