इलेक्ट्रिक बसेस खरेदीसाठी केंद्राची मंजुरी, ३0 बसेसचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 04:05 AM2018-07-30T04:05:53+5:302018-07-30T04:06:06+5:30
महापालिकेच्या परिवहन उपक्रमात लवकरच इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार आहे. केंद्राच्या अवजड उद्योग मंत्रालयाने फेम योजनेअंतर्गत ३0 बसेसना मंजुरी दिली आहे. खासदार राजन विचारे यांनी यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
नवी मुंबई : महापालिकेच्या परिवहन उपक्रमात लवकरच इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार आहे. केंद्राच्या अवजड उद्योग मंत्रालयाने फेम योजनेअंतर्गत ३0 बसेसना मंजुरी दिली आहे. खासदार राजन विचारे यांनी यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून, लवकरच या गाड्या एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेल्या या शहरात महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून प्रवासी सेवा पुरविली जाते. ही सेवा अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी, या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न आहे. सध्या एनएमएमटीच्या ताफ्यातील वातानुकूलित बसेसला प्रवाशांची चांगली पसंती मिळत आहे. आता यात अत्याधुनिक दर्जाच्या इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार आहे.
या बसेससाठी ठाण्याचे खासदार राजन विचारे मागील चार वर्षांपासून प्रयत्नशील होते. केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे २0१४ पासून त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. यातच ३१ आॅक्टोबर २0१७ रोजी अवजड उद्योग मंत्रालयाने एक परिपत्रक काढून फेम योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बसेस खरेदीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार खासदार विचारे यांनी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्यासमवेत महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेवून यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली होती. महापालिका आयुक्तांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तशा आशयाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. परिवहन विभागाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड, परिवहन सदस्य विसाजी लोके, समीर बागवान, राजेंद्र आव्हाड आदींच्या समावेत राजन विचारे यांनी ६ जुलै २0१८ रोजी दिल्ली येथे अवजड उद्योग मंत्रालय विभागाचे सेक्रेटरी विश्वजीत सहाय यांची भेट घेवून इलेक्ट्रिक बसेसच्या प्रस्तावाचे सादरीकरण केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत अवजड उद्योग मंत्रालयाने फेम योजनेअंतर्गत नवी मुंबई महापालिकेला ३0 इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. या बस खरेदीसाठी केंद्र शासनाकडून ६0 टक्के अनुदान मिळणार आहे, तर उर्वरित ४0 टक्के रक्कम महापालिकेला अदा करावी लागणार आहे. साधारण पुढील महिनाभरात या बसेस एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल होतील, असा विश्वास
राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे.
नागरिकांना दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रिक बसेससाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू होता. या बसेसमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे, तसेच इंधनाची बचत होणार आहे.
- राजन विचारे,
खासदार, ठाणे