सिडकोच्या सागरी मार्गाला केंद्राचा हिरवा कंदील

By नारायण जाधव | Published: October 17, 2023 07:08 PM2023-10-17T19:08:40+5:302023-10-17T19:09:00+5:30

३,७२८ खारफुटीच्या कत्तलीसह ३२.६९ हेक्टर राखीव वनजमीन होणार बाधित

central govts green signal for CIDCO's maritime route | सिडकोच्या सागरी मार्गाला केंद्राचा हिरवा कंदील

सिडकोच्या सागरी मार्गाला केंद्राचा हिरवा कंदील

नवी मुंबई : सी लिंक अर्थात शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडणाऱ्या सात किलोमीटर लांबीच्या नव्या सागरी सेतूला केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने अखेर परवानगी दिल्याने सिडकोला मोठा दिलासा मिळाला आहे. ६८१ कोटी ६३ लाख रुपये खर्च प्रस्तावित केलेल्या या मार्गासाठी ३,७२८ खारफुटींची कत्तल करावी लागणार असून त्यासाठी रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील न्हावे येथील ३२.६९ हेक्टर राखीव वनजमीन वळती केली आहे.

गेल्या महिन्यात महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाने हिरवा कंदील देऊन या सागरी मार्गाचा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला होता. त्यास अटी व शर्थींवर पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिल्याने या मार्गातील बहुतांश अडथळे आता दूर झाले आहेत.
सात किमीचा आहे रस्ता प्रस्तावित सागरी मार्ग सी लिंक जंक्शनपासून आम्र मार्ग जंक्शनपर्यंत बांधण्यात येणार असून, त्याची लांबी ७ किमी इतकी आहे. यात मूळ रस्ता ५.८ किमी असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी मार्गिका १.२ किमी आहे.

नवी मुंबई विमानतळ मुंबईच्या आणखी नजीक
दक्षिण मुंबईला थेट नवी मुंबईशी जोडणाऱ्या न्हावा शेवा सी लिंक या २२ किमी लांबीच्या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे तासाचे अंतर २० मिनिटांवर येणार आहे. नवी मुुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे येण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याची एक मार्गिका उलवे जवळच्या शिवाजीनगर येथे तर दुसरी मार्गिका चिर्ले जंक्शजवळ उतरवली आहे. शिवाजीनगर मार्गिकेवरून विमानतळाकडे जाण्यासाठी सिडकोने हा सात किलोमीटरचा सागरी किनारा मार्ग बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे राजधानी मुंबई ही नवी मुुंबई विमानतळाच्या आणखी जवळ येणार आहे.

नवी मुंबईकरांनाही होणार लाभ
प्रस्तावित मार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना वाहतुकीचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. सध्याच्या पाम बीचरोड, आम्र मार्ग, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ वरील वाहतुकीचा भार कमी होऊन सुरळीत प्रवास करणे शक्य होणार आहे. या मार्गावरून विमानतळाच्या दिशेने डाव्या बाजूला नवी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठीही मार्गिका असणार आहे. यामुळे शिवडी-न्हावाशेवा सागरी मार्गावरून बेलापूर, नेरूळ, सीवूड, सानपाडातील प्रवाशांनाही तो सोयीचा ठरणार आहे. तसेच नवी मुंबई विमानतळ, नवी मुंबई सेझसाठी तो फायद्याचा ठरणार आहे.

तीन ठिकाणी उड्डाणपूल
या सात किमीच्या सागरी मार्गाच्या बांधकामात मार्गात तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. याशिवाय एक मोठा, तर छोटा पूल, ६ कल्व्हर्ट बांधण्यात येणार आहे. मार्गात पिलरच्या बांधकामासाठी ५.५७ हेक्टर जमीन कायमची जाणार आहे. यात मोठ्याप्रमाणात खारफुटीसह झाडांचीही कत्तल करावी लागणार आहे.

जळगाव जिल्ह्यात पर्यायी वृक्षलागवड
मार्गाच्या कामासाठी ३,७२८ खारफुटींची कत्तल करावी लागणार असून, त्यासाठी रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील न्हावे येथील ३२.६९ हेक्टर राखीव वनजमीन वळती केली आहे. या नुकसानीच्या बदल्यात शेवरे खुर्द, ता. पारोळा, जिल्हा जळगाव येथे देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करावी लागणार आहे.

पक्षी निरीक्षणाची सक्ती
प्रस्तावित सागरी मार्ग हा फ्लेमिंगो पक्ष्याच्या अधिवास क्षेत्रातून जातो. यामुळे त्याचे बांधकाम सुरू असताना आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही किमान दोन वर्षांपर्यंत त्याच्यामुळे फ्लेमिंगो पक्षांसह समुद्री पक्षी आणि वन्य प्राण्यांच्या जीवनमानावर काय बरेवाईट परिणाम झाले याचे निरीक्षण मुंबई विद्यापीठाच्या झुनझुनवाला महाविद्यालयांसारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयाकडून करून त्याचा अहवाल पाठवावा, अशी सूचना वने आणि पर्यावरण मंत्रालयाने केली आहे.

मच्छीमारांवर परिणाम नको
प्रस्तावित सागरी मार्गाच्या बांधकामामुळे मच्छीमारांचे येण्या-जाण्याच्या मार्ग, खाडी प्रदूषण होऊन त्यांच्या परिणाम व्हायला नको, याची दक्षता घेण्यास सांगितले आहे.

Web Title: central govts green signal for CIDCO's maritime route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.