सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : पालिकेने घणसोली येथे उभारलेल्या सेंट्रल पार्कच्या उद्घाटनाचे घोंगडे दोन वर्षांपासून भिजत पडले आहे. परिणामी, या पार्कमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून त्यांना कथित श्वानप्रेमींचाही आधार मिळत चालला आहे. त्यामुळे वेळीच या पार्कचे उद्घाटन करून ते जनतेच्या वापरासाठी खुले करण्याची मागणी होत आहे.महापालिकेच्या वतीने घणसोली येथे भव्य सेंट्रल पार्क उभारण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या पार्कच्या कामात सुरुवातीपासून अनेक विघ्न आले होते. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून या पार्कच्या उद्घाटनाचेही घोंगडे भिजत पडले आहे. पुनर्वसन केल्याशिवाय उद्घाटन होऊ न देण्याचा इशारा सावली ग्रामस्थांनी सुरुवातीला दिला होता. त्यावरचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याने हे पार्क लवकरच सर्वसामान्यांच्या वापरासाठी खुले होईल, अशी अपेक्षा घणसोलीकरांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, पुनर्वसनाचाही मुद्दा लांबणीवर जात असल्याने घणसोलीतील सेंट्रल पार्कच्या उद्घाटनाचे घोंगडे भिजत पडले आहे. या पार्कमध्ये तरणतलावासह, स्केटिंग, फुटबॉल टर्फ मैदान यासह लहान मुलांची खेळणी व इतर मनोरंजनाची साधने पुरवण्यात आली आहेत. त्यामुळे नेरुळच्या वंडर्स पार्कप्रमाणेच घणसोलीचे हे सेंट्रल पार्क नागरिकांच्या आकर्षणाचा मुद्दा ठरणार आहे; परंतु सर्व प्रकारचे काम पूर्ण होऊनही, गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना कुंपणाबाहेरूनच पार्कमधील सुविधांचे नेत्रसुख घ्यावे लागत आहे. तर पार्कमध्ये नागरिकांचा वावर नसल्याची संधी परिसरातील भटक्या कुत्र्यांनी साधली असून त्यांचा वावर वाढला आहे. पार्कच्या प्रवेशद्वाराखालील मोकळी जागा तसेच मंदिराच्या बाजूकडील अर्धवट बांधलेले कुंपण यामधून भटक्या कुत्र्यांकडून आतमध्ये प्रवेश मिळवला जात आहे. त्यांच्याकडून उद्यानातील हिरवे गालिचे, शोभेची झाडे, वायर यांचे नुकसान केले जात आहे. मात्र, या भटक्या कुत्र्यांना पार्कमधून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केल्यास, कथित श्वानप्रेमींकडून त्याविरोधात तक्रारींचा भडीमार केला जात आहे. यामुळे तिथल्या सुरक्षारक्षकांनाही उद्यानात भटकी कुत्री वावरत असताना बघ्याची भूमिका घ्यावी लागत आहे; परंतु सदर पार्क नागरिकांच्या वापरासाठी खुले केल्यास भटक्या कुत्र्यांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.त्या ठिकाणचा तरणतलाव पार्कच्या वैशिष्ट्यांमध्ये विशेष भर टाकणारा ठरणार आहे; परंतु त्याच्या उभारणीत नियोजनाच्या अभावामुळे देखभाल दुरुस्ती प्रशासनाची डोकेदुखी ठरणार आहे. तरणतलावाचा संपूर्ण भाग बंदिस्त करणे आवश्यक असतानाही ते उघडे ठेवण्यात आले आहे. यामुळे तरणतलावातील पाण्याभोवती कबुतरखाना बनला आहे. त्यांच्याकडून पसरवल्या जाणाऱ्या घाणीमुळे सफाई कामगारांवरील ताण वाढत आहे. तर प्रेक्षक गॅलरीच्या छतासाठी अनेक टन वजनाचे लोखंड वापरले आहे. त्याच्या मध्यभागी कोणताही आधार देण्यात आलेला नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.>महिला जलतरणपटूंची सुरक्षा वाºयावरसेंट्रल पार्कमधील पालिकेचा हा पहिलाच तरणतलाव आहे. यामुळे पालिकेच्या जलतरण स्पर्धांसह हौशी जलतरणपटूंसाठी हा तरणतलाव सुवर्णपर्वणी ठरणार आहे; परंतु तरणतलाव उघड्यावर असल्याने पार्कलगतच्या इमारतींमधूनही त्या ठिकाणी डोकावणे शक्य होणार आहे. तर पार्कमध्ये फिरण्यासाठी आलेल्या व्यक्तींकडूनही त्या ठिकाणी सहज प्रवेश केला जाऊ शकतो. यामुळे महिला जलतरणपटूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे.>पंतप्रधानांच्याहस्ते उद्घाटन?घणसोलीच्या सेंट्रल पार्कसह नेरुळच्या वंडर्स पार्कमध्ये होणारे सायन्स पार्क हे पालिकेचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. त्यानुसार सेंट्रल पार्कचे उद्घाटन व सायन्स पार्कचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा पालिका अधिकाºयांमध्ये आहे. त्यामुळेही पार्कचे उद्घाटन लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.>पार्कमध्ये व्यायामशाळेची मागणीपार्कमध्ये अद्ययावत सुविधा पुरवण्याकडे पालिकेने विशेष लक्ष दिले आहे; परंतु तरणतलावाच्या ठिकाणी बनवलेल्या प्रशस्त चेंजिंग रूमच्या जागेचेही नियोजन चुकले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा मोकळीच असून त्याचा वापर व्यायामशाळेसाठी करावा, अशीही मागणी होत आहे. परिसरात पालिकेची बंदिस्त व्यायामशाळा नसल्याने तसे झाल्यास नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरू शकते.
सेंट्रल पार्कचे उद्घाटन रखडले, नियोजनात त्रुटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:31 AM