सेंट्रल पार्कचा दुसरा टप्पा रखडला, सिडको प्रशासनाची उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 02:57 AM2018-07-05T02:57:04+5:302018-07-05T02:57:14+5:30
लंडनच्या हाइडपार्कच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या खारघर येथील सेंट्रल पार्कचा दुसरा टप्पा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या याच परिसरातील कोयना धरणग्रस्तांच्या २४ एकर जागेचा वाद गाजत आहे.
- वैभव गायकर
पनवेल : लंडनच्या हाइडपार्कच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या खारघर येथील सेंट्रल पार्कचा दुसरा टप्पा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या याच परिसरातील कोयना धरणग्रस्तांच्या २४ एकर जागेचा वाद गाजत आहे. त्याचा फटका सेंट्रल पार्कच्या दुसऱ्या टप्प्याला तर बसणार नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
खारघर सेक्टर २३ आणि २४मध्ये सिडकोने ३० हेक्टर जागेवर सेंट्रल पार्क साकारले आहे. सध्या एकूण जागेचा फक्त ७५ टक्केच भाग विकसित करण्यात आला आहे. दुसºया टप्प्याचा विकास प्रस्तावित आहे. सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी आपल्या कार्यकाळात सेंट्रल पार्कच्या दुसºया टप्प्याच्या कामाला निर्णायक गती दिली होती. सार्वजनिक व खासगी भागीदारीतून हा टप्पा विकसित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. त्यासाठी २०१४ मध्ये वित्तीय सल्लागार कंपनीचीही नियुक्ती करण्यात आली होती. या सल्लागार कंपनीच्या शिफारशीनुसार स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आल्या होत्या. अंतिम प्रक्रियेत भारतीतील पहिल्या दहा अग्रगण्य कंपन्यांत समावेश असलेल्या चेन्नई येथील व्हीपीजी युनिव्हर्सल किंग्डम या कंपनीची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली होती. कंत्राटदार कंपनीची निवड होऊन तीन-चार वर्षांचा कालावधी उलटला तरी सेंट्रल पार्कच्या दुसºया टप्प्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही. दरम्यान, सेंट्रल पार्कच्या दुसºया टप्प्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, अम्युसमेंट पार्क, वॉटर पार्क, स्नो पार्क, व्हर्च्युअल रियालिटी गेम्स, तारांकित हॉटेल आदी सेवांचा समावेश आहे.
हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याकडे निविदा समितीने ठेवला होता. मात्र, भूषण गगराणी यांची बदली झाल्याने आता हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यावर येऊन ठेपली आहे.
हा प्रकल्प नक्की कोणत्या कारणास्तव रखडला आहे, याबाबत नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, सेंट्रल पार्क परिसरातील घरांच्या किमती तुलनात्मकदृष्ट्या अधिक आहेत. सेंट्रल पार्कच्या दुसºया टप्प्याच्या विकासामुळे या परिसरातील घरांना चांगली मागणी येईल, या उदेशाने अनेकांनी दामदुपटीने येथे घरे घेतली; परंतु अनेक वर्षे झाली
तरी दुसरा टप्पा कागदारवरच
राहिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दुसºया टप्प्यातील वैशिष्ट्ये
आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, अम्युसमेंट पार्क, वाटर पार्क, स्नो पार्क, व्हर्च्युअल रियालिटी गेम्स, तारांकित हॉटेल आदी सेवांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, खोपोलीमधील अॅडलॅब्स इमॅजिका आणि मुंबईतील एस्सल वर्ल्डपेक्षाही सेंट्रल पार्क भव्य व दिव्य असणार आहे.
खारघर शहरात सेंट्रल प्रकल्प येणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या विक्री घरांच्या किमती दुपटीने वाढविल्या, असे असतानाही अनेकांनी या परिसरात घरे घेतली; परंतु दहा वर्षांचा काळ उलटला तरी सेंट्रल पार्कच्या दुसºया टप्प्याचे काम सुरू न झाल्याने येथे घरे घेणाºयांची निराशा झाली आहे. केवळ सेंट्रल पार्कच्या विस्तारित टप्प्यामुळे आम्ही येथे महागड्या दराने घरे घेतली. जर हा प्रकल्पच होणार नसेल तर ही निव्वळ फसवणूक असल्याचा आरोप येथील रहिवासी स्वप्निल पवार यांनी केला आहे.
सेंट्रल पार्कच्या दुसºया टप्प्याच्या कामांसंदर्भात लवकरच कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. याबाबत कार्यालयीन स्तरावर लवकरच निर्णय घेतला जाईल.
- के. के. वरखेडकर,
मुख्य अभियंता, सिडको