पालिकेची विहिरींमधल्या पाणीवापरावर बंदी

By admin | Published: April 2, 2016 03:01 AM2016-04-02T03:01:13+5:302016-04-02T03:01:13+5:30

पाण्याच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने शहरातील विहिरींमधील पाणीवापरावर बंदी घातली आहे. शहरात सुमारे १३० विहिरी असून त्यापैकी अनेक विहिरींमधील

Cessation of drinking water wells | पालिकेची विहिरींमधल्या पाणीवापरावर बंदी

पालिकेची विहिरींमधल्या पाणीवापरावर बंदी

Next

नवी मुंबई : पाण्याच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने शहरातील विहिरींमधील पाणीवापरावर बंदी घातली आहे. शहरात सुमारे १३० विहिरी असून त्यापैकी अनेक विहिरींमधील पाणी बांधकामासाठी वापरले जाते. मात्र दुसरीकडे शहरातील तलावांचे पाणी बांधकामासाठी वापरण्यास अनुमती देण्यात आली आहे.
शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवणाऱ्या महापालिकेला सध्या पाणीपुरवठ्यात हात आखडता घेण्याची वेळ आली आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असूनही त्यामधील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पाण्याच्या वापरावर नियंत्रण मिळवावे लागत आहे. त्याकरिता पाणीपुरवठाही मर्यादित करण्यात आला आहे. अशातच शहरातल्या पालिकेच्या ताब्यातील विहिरींमधून उपसले जाणारे पाणी देखील पालिकेच्या नजरेत आले आहे. शहरात सुमारे १३० विहिरी असून त्यापैकी अनेक विहिरींमधील पाणी टँकर व्यवसायिकांमार्फत बांधकामांना पुरवले जात होते. याकरिता आजतागायत पालिकेची कसलीही परवागनी घेतली जात नव्हती. परंतु सध्या भेडसावत असलेल्या पाणीटंचाईमुळे विहिरींमधून होणाऱ्या पाणीचोरीलाही आळा घालण्यासाठी पाऊल पालिकेने उचलले आहे. ज्या विहिरींमधून पाण्याचा उपसा केला जात होता त्या ठिकाणी टँकरने पाणी भरण्यास बंदी घातली आहे. तशा प्रकारचे सूचना फलक देखील पालिकेतर्फे विहिरींच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.
दुसरीकडे मात्र बांधकामासाठी तलावांमधील पाणी टँकरने भरण्याची अनुमती महापालिकेने दिलेली आहे. सद्य:स्थितीमध्ये महापालिकेतर्फे तलावांच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. अशावेळी गाळ साफ करण्यासाठी तलावांमधील पाण्याचा साठा कमी होणे गरजेचे आहे. यामुळेच तलावातील पाण्याचा उपसा झाल्यानंतर गाळ काढता येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cessation of drinking water wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.