कामोठयात फेरीवाल्यांना चोपणा-या मनसे कार्यकर्त्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:52 AM2017-11-28T10:52:23+5:302017-11-28T10:54:33+5:30
कामोठेमध्ये फेरीवाल्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. सुधीर नवले, अविनाश पडवळ मिलिंद खाडे या तिघांना मंगळवारी सकाळी पोलिसांनी अटक केली.
नवी मुंबई - कामोठेमध्ये फेरीवाल्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. सुधीर नवले, अविनाश पडवळ मिलिंद खाडे या तिघांना मंगळवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. विक्रोळीत मराठी पाटयांसाठी निवेदन द्यायला गेलेल्या मनसे पदाधिका-यांना फेरीवाल्यांकडून मारहाण झाल्यानंतर कामोठेमध्ये मनसेने फेरीवाल्यांविरोधात उग्र आंदोलन केले.
कामोठेमध्ये मनसैनिकांनी फेरीवाल्यांना जबर मारहाण करत त्यांचे स्टॉल उखडून टाकले. फेरीवाल्यांना अक्षरक्ष तिथून पळवून लावले. यापूर्वीही मनसेने फेरीवाल्यांविरोधात कामोठेमध्ये उग्र आंदोलन केले आहे.
रविवारी मनसेचे विक्रोळीतले उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम, विनोद शिंदे आणि उपशाखा अध्यक्ष उपेंद्र शेवाळे एका दुकानावर मराठी पाटी लावावी या मागणीसंदर्भात दुकानदाराला भेटण्यासाठी गेले होते. दुकानदार आणि ढोलम यांची चर्चा सुरू असताना परिसरातले फेरीवाले तिथं गोळा झाले, त्यांनी ढोलम आणि यांच्य सहका-यांवर हल्ला केला आणि बेदम मारहाण केली. उपेंद्र शेवाळेंच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात शेवाळेंच्या कवटीला फ्रॅक्चर झालं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वजीत ढोलम यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. विश्वजीत ढोलम यांना मारहाण झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी पुन्हा त्या व्यापाऱ्याकडे जाब विचारायला गेले होते. तेव्हा फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना अजून मारहाण केली. या मारहाणीत शिंदे आणि उपेंद्र शेवाळे हे जखमी झाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेचे मालाडमधले नेते सुशांत माळवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.
पुन्हा एकदा मनसेच्या गुंडांनी मार खाल्ला - संजय निरुपम
विक्रोळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांवर फेरीवाल्यांकडून झालेल्या हल्ल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केले आहे. काल विक्रोळीत मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला. आमचा हिंसेवर विश्वास नाही पण गरीबांच्या पोटावर जेव्हा मनसेचे गुंड लाथ मारणार तेव्हा प्रतिक्रिया ही उमटणारच. त्यामुळे मनसेने गुंडगिरी सोडून द्यावी असे संजय निरुपम यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.