अपंगांचे कुटुंबासह साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 02:16 AM2017-08-15T02:16:15+5:302017-08-15T02:16:17+5:30

पनवेल महापालिकेच्या विरोधात अपंग बांधवांनी कुटुंबीयांसहित साखळी उपोषण सुरू केले आहे.

Chain fasting with the family of the disabled | अपंगांचे कुटुंबासह साखळी उपोषण

अपंगांचे कुटुंबासह साखळी उपोषण

Next

पनवेल : पनवेल महापालिकेच्या विरोधात अपंग बांधवांनी कुटुंबीयांसहित साखळी उपोषण सुरू केले आहे. या वेळी अपंगांनी आयुक्त सुधाकर शिंदे यांचा निषेधार्थ घोषणा दिल्या.
गटई कामगारांप्रमाणे दुर्बल, अपंग स्टॉलधारकांची कारवाई त्वरित बंद करावी. स्मार्ट सिटीच्या नावाचा वापर करून पनवेल महापालिकेने अपंग स्टॉलधारकांचे धोरण न ठरविता तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था सर्वसाधारण नागरिकांसोबत केल्याच्या निषेधार्थ शेकडो अपंगांनी कुटुंबीयांसोबत साखळी उपोषण सुरू केले आहे. ३ टक्के निधी असो, ३ टक्के गाळे असो वा अपंगांच्या इतर सुविधा असोत, अपंगांना त्या कधी मिळाल्याच नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून महापालिकेच्या कारवाईने अपंग स्टॉलधारक पूर्ण खचून गेले आहेत. पनवेल महापालिकेने या सर्वांचा विचार करून अपंगांचे धोरण राबवून गटई कामगारांप्रमाणे अपंगांना देखील त्यांच्या जागेवरच स्वयंरोजगार मिळावा, यासाठी सहकार्य करावे, स्मार्ट सिटीमध्ये अपंगांना स्टॉल देवून त्यांनाही स्मार्ट करणे, पनवेल महापालिकेने अतिक्र मण हटाव मोहिमेमधून अपंगांना वगळून त्यांना व्यवसाय संरक्षण मिळावे व त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सहकार्य करावे, अशा मागण्या अपंगधारकांनी केल्या आहेत. पनवेल महापालिका हद्दीत अपंग स्टॉलधारक हे गेली अनेक वर्षे या जागेवर व्यवसाय करत आहेत. मात्र पालिकेने केलेल्या कारवाईत अपंगांचे स्टॉल उद्ध्वस्त केले. त्यामुळे ४२ अपंग स्टॉलधारकांनी महापालिकेसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.
पूर्वीच्या पनवेल नगरपरिषदेने आतापर्यंत अपंगांबाबत सकारात्मक धोरण कधी घेतलेच नाही. अपंगांना कायमस्वरूपी अधिकार कधी मिळाला नाही. गेल्या वर्षी ५ ते १० हजार निधी मिळाला तो देखील अपंगांना आंदोलन करून. नगरपालिकेचे सर्व्हे झाले पण त्यामध्ये अपंग म्हणून कधी सर्व्हे झालेच नसल्याचे अनेक आरोप यावेळी करण्यात आले.

Web Title: Chain fasting with the family of the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.