ड्रग्ज पुरवठ्यात विद्यार्थ्यांची साखळी, चौघांकडून २३ लाखांचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 08:37 AM2024-03-31T08:37:44+5:302024-03-31T08:38:17+5:30
Crime News: अमली पदार्थविरोधी पथकाने उलवे येथून २३ लाख रुपयांचे एलसीडी ड्रग्ज जप्त केले. या तस्करीत चार विद्यार्थी पोलिसांच्या हाती लागले. ही कारवाई शुक्रवारी रात्री अमली पदार्थविरोधी पथकाने केली. हिमांशू प्रजापती (१९), विजय शिर्के (२३), सिद्धेश चव्हाण (२५) व आदर्श सुब्रमण्यम (२२) अशी आरोपींची नावे आहेत.
नवी मुंबई - अमली पदार्थविरोधी पथकाने उलवे येथून २३ लाख रुपयांचे एलसीडी ड्रग्ज जप्त केले. या तस्करीत चार विद्यार्थी पोलिसांच्या हाती लागले. ही कारवाई शुक्रवारी रात्री अमली पदार्थविरोधी पथकाने केली. हिमांशू प्रजापती (१९), विजय शिर्के (२३), सिद्धेश चव्हाण (२५) व आदर्श सुब्रमण्यम (२२) अशी आरोपींची नावे आहेत.
उलवे परिसरात ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला. त्या ठिकाणी आलेल्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २२ लाख ८० हजार रुपयांचे ११४ एलसीडी पेपर मिळाले. या प्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमांशू उलवे येथील राहणारा असून, बाकीचे पनवेल येथे राहणारे आहेत. यापूर्वी देखील शहरातून एलसीडी पेपर जप्त केले आहेत. विद्यार्थी, तरुणांमध्ये ड्रग्ज सेवनाचे प्रमाण अधिक आहे. शहरातील काही क्लबमध्येदेखील त्याचा वापर होत असल्याची दाट शक्यता आहे.
रॅकेट उद्ध्वस्त
अटक केलेले चौघेही विद्यार्थी असून, त्यांच्यामार्फत पनवेल परिसरातील नशेच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवले जात होते. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सापळा रचला. चौघांच्या अटकेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवठ्याचे रॅकेट उद्ध्वस्त झाले असून यात आणखी कोण सहभागी आहेत, ड्रग्ज कोठून आणले, याचा तपास पोलिस करत आहेत.