नवी मुंबई : वाशी येथे घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वी पोलिसांवर देखील हल्ले केले आहेत. यामुळे त्याला तडीपार करण्यात आले असतानाही तो सोनसाखळी चोरी करत होता.
वाशी सेक्टर २८ येथे नर्सरी मध्ये फुलझाडे घेत असताना महिलेचे मंगळसूत्र चोरी झाले होते. दुचाकीवर आलेल्या गुन्हेगाराने त्यांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याद्वारे गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी निरीक्षक संजय नाळे, सहायक निरीक्षक पवन नांद्रे यांचे पथक केले होते. त्यांनी परिसरातले सीसीटीव्ही तपासून संशयित मोटारसायकलची माहिती मिळवली होती.
मात्र गुन्हेगाराकडून सातत्याने ठिकाण बदलले जात होते. अखेर अंधेरी येथे दोन दिवस पाळत ठेवून त्याला पकडण्यात आले. शनिवारी चौकशीत त्याचे नाव अरबाज कुतुबुद्दीन अतार असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले. त्याच्यावर १५ ते २० यापूर्वीचे गुन्हे दाखल असून त्याने पोलिसांवर देखील हल्ले केले आहेत. यामुळे त्याला मुंबई परिसरातून तडीपार करण्यात आले आहे. तर तडीपार असतानाही तो नवी मुंबई व लगतच्या परिसरात गुन्हे करून मुंबईत वावरत होता. त्याच्याकडून वाशीतील गुन्ह्यात चोरलेले मंगळसूत्र व गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे.